कल्याण दि.26 जुलै :
कल्याणहून पडघ्याला जाणाऱ्या मार्गावर असणारा गांधारी पूलावरील वाहतूक खबरदारीचा उपाय म्हणून बंद करण्यात आली आहे. 2 दिवसांपूर्वी आलेल्या पुरामुळे गांधारी पुलाच्या पिलरला नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती पीडब्ल्यूडीकडून देण्यात आली आहे. त्यामूळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून आज रात्रीपासून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याची माहिती कल्याण शहर वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी दिली.
तर याबाबत पीडब्ल्यूडी विभागाशी संपर्क साधला असता पुलाच्या पिलरचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आता रात्रीची वेळ असल्याने उद्या सकाळी तांत्रिक अभियांत्रिकी विभागातील तज्ञ व्यक्ती येऊन या संपूर्ण पुलाची पाहणी करतील. त्यानंतरच सर्व प्रकार स्पष्ट होईल असेही पीडब्ल्यूडीतर्फे सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर कल्याण वाहतूक शाखेने खबरदारी म्हणून या पुलावरील सर्व वाहतूक बंद केली आहे. याठिकाणी वाहतूक शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्याचे अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान आज रात्रीपासून गांधारी पुलावरील वाहतूक बंद केल्याने पडघाकडे जाणाऱ्या वाहनांना भिवंडी बायपासमार्गे वळसा घालून जावे लागले. तर गांधारी पुलापलीकडील सोसायटीमध्ये राहणारे काही जण चालत आपल्या घरी गेल्याचे दिसून आले.
पडघामार्गे येणारी वाहतूक सोनाळे गावातून वळवण्यात आली आहे. तर गांधारी पुलावरून जाणारी वाहतूक दुर्गामाता चौक, दुर्गाडीमार्गे वळवण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.