नौदल संग्रहालय, नदी किनारा सुशोभीकरणाच्या भूमीपूजनासह केडीएमसीच्या नव्या सभागृहाचे उद्घाटन
कल्याण – डोंबिवली दि.16 फेब्रुवारी :
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महत्वाच्या विकासकामांचे भूमीपूजन करण्यासह काही उपक्रमांचे उद्घाटन करण्यासाठी शिवसेनेचे युवानेते आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उद्या (गुरुवारी 17 फेब्रुवारी 2022) कल्याणात येत आहेत.
स्मार्ट कल्याण डोंबिवली अर्थातच स्मार्ट सिटीअंतर्गत कल्याणच्या खाडीकिनारी दुर्गाडी किल्ल्याजवळ उभारण्यात येणाऱ्या नौदल संग्रहालय आणि अडीच किलोमीटरच्या खाडीकिनारा सुशोभीकरणाच्या कामाचे आदित्य ठाकरे यांच्या हस्ते भूमीपूजन केले जाणार आहे. त्याचसोबत नव्या दुर्गाडी पुलाच्या पूर्ण झालेल्या उर्वरित दोन मार्गिकांचेही लोकार्पण त्यांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.
त्याशिवाय खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून कल्याण पूर्वेतील तिसगाव येथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने उभारलेल्या डायलिसिस केंद्राचे लोकार्पण तसेच महापालिका मुख्यालयात नव्याने सुशोभीकरण झालेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे उद्घाटनही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते केले जाणार आहे.
दरम्यान पर्यटन मंत्री आणि शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे कल्याणात येणार असल्याने केडीएमसी प्रशासनाकडूनही गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी केली जात आहे.
असे असेल नौदल संग्रहालय…
दुर्गाडी किल्ल्यालगतच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली होती. या किना-याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून नदीकिनारा आणि नेव्हल गॅलरी विकसित करण्याचा प्रकल्प स्मार्ट सिटीअंतर्गत हाती घेण्यात आला आहे. यामध्ये शिवकालीन काळातील आरमार प्रतिकृती संग्रहालय ( Naval gallery), भारतीय नौसेनेच्या बलाढ्य जहाजाची प्रतिकृती, आयएनएस अरिहंतप्रमाणे उभारली जाणार आहे. समुद्र किनाऱ्याचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य भारतीय नौसेनेचा अतिविशाल माहितीपट तसेच 2.5 कि.मी किनारा सुशोभीकरण, दुर्गाडी किल्ल्यालगत बगीचा विकसित करणे, पायवाट आणि सायकल ट्रॅक बनविणे, लहान मुलांसाठी प्ले एरिया, व्याख्यान एरिया इत्यादी सुविधांमार्फत कल्याणचा खाडीकिनारा विकसित केला जाणार आहे. पुढील पिढ्यांना नाविक (Naval) क्षेत्राच्या भविष्यातील संधींची माहिती देणारे हे शिवकालीन आरमार प्रतिकृती संग्रहालय कल्याणच्या सार्वजनिक आणि सांस्कृतिक वास्तूंच्या यादीत नक्कीच भर टाकेल.
हा सर्व प्रकल्प सीआरझेडच्या अखत्यारीत येत असल्याने बांधकामाविषयीचे नियम पाळून कल्पकतेने हे केंद्र उभारले जाणार आहे. भारतीय नौसेनेबरोबर गेली अनेक वर्ष कार्यरत असलेले वारसा व्यवस्थापन तज्ञ सोबत घेऊन तसेच कल्याण परिसरातील उच्च दर्जाचे कलावंत निवडून हा प्रकल्प साकारला जाणार आहे. चित्र, शिल्प, उत्थित शिल्प, मॉडेल तसेच ग्राफिक्सच्या माध्यमातून कल्याण परिसरातील अतिप्राचीन नाविक परंपरांपासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा आरमारापर्यंत तसेच भारतीय नौसेनेपर्यंतचा अति विशाल माहितीपट या केंद्राच्या दालनात उलगडून दाखवण्यात येणार आहे.
महापालिकेचे सुसज्ज सभागृह…
तर नुतनीकरण करण्यात आलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहामध्ये एकूण 145 महापालिका सदस्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षक गॅलरी, पत्रकार गॅलरी आणि महत्वाच्या व्यक्तीसाठी व्हीआयपी कक्ष अशी सुसज्ज आसन व्यवस्था आहे. सभागृहामध्ये उर्जा कार्यक्षम एलईडी दिवे आणि अत्याधुनिक पध्दतीची विद्यूत संच मांडणी करण्यात आली असून 31 टन क्षमतेचे मित्सुबीशी कंपनीची उर्जा बचत करणारी VRV प्रकारची अद्ययावत अशी वातानुकुलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्याचप्रमाणे टेलीव्हिक कंपनीची अद्ययावत ऑडीयो, 140 डेलिगेट युनिट, 1 चेअरमन युनिट, 12 स्पिकर अशी यंत्रणाही उभारण्यात आलेली आहे.
असे आहे डायलिसिस केंद्र…
तर कल्याण पूर्व परिसरात प्रभाग क्र. 100 तिसगाव गावठाणमधील यशवंत छत्र बंगला, विजय नगर-आमराई रोड येथे 3 हजार 200 चौ. फूट क्षेत्रामध्ये डायलिसिस सेंटर तयार करण्यात आले आहे. या डायलिसिस सेंटरमध्ये 10 बेड्स, नर्सेस रूम, फार्मसी रूम, स्वागत कक्ष, डायलिसिस वॉशिंग एरिया, R.O प्लांट अशी सुसज्ज सुविधा निर्माण करण्यात आली आहे. पीपीपी तत्वावर हे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात येत असून अपेक्स किडनी केअर या संस्थेमार्फत सेवा पुरविण्यात येणार आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल रुग्णांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत डायलिसिस सुविधा उपलब्ध होणार आहे. तर या योजनेत समाविष्ट न होऊ शकणाऱ्या रुग्णांना रु.849/- तसेच HIV रुग्णांसाठी रु. 851/- इतक्या अल्प दरात ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या केंद्रामध्ये 10 डायलिसीस मशिन।उपलब्ध असून प्रतिदिन 30 रुग्णांना डायलिसीस सुविधा पुरवणे शक्य होणार आहे. कल्याण पूर्व ड प्रभाग , जे प्रभाग तसेच कल्याण ग्रामीण परिसरात डायलिसिस केंद्र नसल्यामुळे गरजू लोकांना कल्याण पश्चिम किंवा डोंबिवली, ठाणे येथे जावे लागते. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी,।शहर अभियंता सपना कोळी देवनपल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम आणि विद्युत विभागातील अभियंत्यांनी, आरोग्य विभागाच्या मदतीने हे सुसज्ज डायलिसीस केंद्र तयार केले आहे.