सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारासाठी कल्याण पूर्वेत झाली सभा
कल्याण दि.12 नोव्हेंबर :
बॅगा तपासल्या तर काय वाईट झाले? त्याचा एवढा इशु करण्याचे कारण नव्हते. प्रचारादरम्यान आपली बॅगही निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासली असून आम्ही अजिबात रडारड केली नाही. परंतु आता त्यांच्याजवळचे सर्व विषय संपल्यानेच रडारड करून मत मागायचे काम सुरू असल्याचा हल्लाबोल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर केला. (Topics close to him are over, so now his radar is on – Devendra Fadnavis attacks Uddhav Thackeray over bag checking)
कल्याण पूर्वेतील महायुतीचे उमेदवार सुलभा गणपत गायकवाड यांच्या प्रचारासाठी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. त्यावेळी आपल्या भाषणात फडणवीस यांनी उध्दव ठाकरे, काँग्रेससह महा विकास आघाडीचा खरपूस समचार घेतला.
आताचे आमचे सरकार हे गतींचे आणि प्रगतीचे सरकार आहे. तर उद्धव ठाकरे यांचे सरकार स्थगिती सरकार होते. प्रत्येक योजनेला, विकासकामांना त्यांनी स्थगिती दिली.तर लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांचा हिशोब चुकता करताना फडणवीस यांनी सांगितले की मार्केटमध्ये तुमचे काही सावत्र भाऊ फिरत आहेत, उध्दव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवाल्या सावत्र भावांनी लाडकी बहिण योजनेविरोधात कोर्टात गेले. मात्र कोर्टाने त्यांना फटकारले आणि ही योजना बंद होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
या महाराष्ट्रात उध्दव ठाकरे यांचे सरकार होते तेव्हा महाराष्ट्राची उद्योग क्षेत्रात अधोगती सुरू होती. मात्र आपले सरकार आले आणि कर्नाटक , गुजरात यांच्यापेक्षा महाराष्ट्र उद्योग गुंतवणुकीत पहिल्या नंबरवर आला. यावर्षी तर एकूण गुंतवणुकीच्या 52 टक्के गुंतवणूक आम्ही महाराष्ट्रात आणली. आम्ही त्रिमूर्ती त्रिशूळ आहोत, महाराष्ट्राला पुढे नेणारा त्रिशूळ आहे. आम्ही सर्वांनी मिळून संकल्प केलाय विकास हा केंद्रस्थानी आणि देशातील प्रत्येक राज्याला हेवा वाटेल असा महाराष्ट्र बनवण्याचे काम आम्ही करणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
तर उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका करताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की रडणारे रोज रडत आहेत, रडणाऱ्याना रडू द्या. मात्र आम्ही लढणारे आहेत, रडणाऱ्याना मागे राहू द्या, लढणाऱ्याना तुम्ही साथ द्या असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
तर हा देवाभाऊ गॅरंटी घेतो की कल्याण पूर्वेला एक आदर्श मतदार संघ करण्याचे काम आम्ही करणार आणि सुलभा गायकवाड यांना प्रचंड मतांनी निवडून आणणार असल्याचा निर्वाळाही त्यांनी यावेळी दिला.