मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत अर्ज केला दाखल
डोंबिवली दि.24 ऑक्टोबर :
कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रमूख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल केल्यानंतर प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की 5 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आपण आमदार म्हणून निवडून आलो होतो. त्याच दिवशी आपण आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरताना अनोखा दुग्धशर्करा योग जुळून आल्याने हा दिवस आपल्यासाठी लकी असल्याची भावना राजू पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. (“Today is a lucky day for us”; Raju Patil of MNS told this reason after filling the nomination form)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या घोषणेनूसार आज राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना उपस्थिती दर्शवली. इतकेच नाही तर उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राजू पाटील आणि अविनाश जाधव यांना गाडीमध्ये बसवत राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या गाडीचे सारथ्य केले.
2019 मध्ये आजच्याच दिवशी तत्कालीन विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आपण आमदार झालो होतो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आणि लकी आहे. राज ठाकरे पहिल्यांदा आपल्या आणि अविनाश जाधव यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी स्वतः आले. आमच्या पाठीमागे राज साहेबांचा हात असून आम्ही अत्यंत आत्मविश्वासाने निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचेही राजू पाटील यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी राजू पाटील यांच्या समर्थकांनी मोठी रॅली काढून शक्तीप्रदर्शन केल्याचे दिसून आले.