Home ठळक बातम्या कल्याणात भलेमोठे होर्डिंग कोसळून तीन जण जखमी; महाकाय होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कल्याणात भलेमोठे होर्डिंग कोसळून तीन जण जखमी; महाकाय होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

कल्याण दि.2 ऑगस्ट :
मुंबईतील घाटकोपर सारखी भयानक होर्डिंग दुर्घटना कल्याण पश्चिमेत आज होता होता वाचली. कल्याण पश्चिम येथील सहजानंद चौकात लावण्यात आलेले एक मोठे होर्डिंग अचानक कोसळून तीन नागरिक जखमी झाले तर अनेक गाड्यांचे नुकसान झाले आहे. आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. (Three people injured in huge hoarding collapse in Kalyan; The issue of safety of the giant hoarding is on the table)

कल्याण पश्चिमेतील सहजानंद चौक परिसरात रस्त्याच्या चारी बाजूला मोठमोठाले होर्डिंग उभारण्यात आले आहे. या होर्डिंगच्या सुरक्षेचा प्रश्न वारंवार उपस्थित करूनही महापालिका प्रशासन त्याकडे कानाडोळा करत असतानाच आज ही घटना घडली आहे. आज सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास सहजानंद चौकात काझी हॉस्पिटल शेजारील हे भले मोठे होर्डिंग अचानक खाली कोसळले. ज्यामध्ये तीन नागरिक जखमी झाले असून अनेक टू व्हीलर, काही रिक्षा आणि एका फोर व्हीलरचे नुकसान झाले आहे. तर ही घटना घडल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी ठिय्या आंदोलन करत याप्रकरणी कंत्राटदारावर कायदेशीर कारवाई होत नाही तोपर्यंत होर्डिंग उचलून देण्याचा संतप्त पवित्रा घेतला. कल्याण डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उपायुक्त प्रभाग अधिकारी आदींनी या मनसेच्या पदाधिकाऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला परंतु मनसे पदाधिकारी आपल्या भूमिकेवर ठाम होते अखेर ही घटना घडल्याच्या तासाभरानंतर केडीएमसी आयुक्त डॉक्टर इंदू राणी जाखड या घटनास्थळी दाखल झाल्या.

त्यांनी या घटनेतील दोषी कंत्राट दारावर गुन्हे दाखल करण्यासह त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात येईल असे आश्वासन यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले. परंतु त्यावरही मनसे पदाधिकाऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी या कारवाईचे लेखी पत्र देण्याची मागणी केडीएमसी आयुक्तांकडे केली. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर, उपशहर प्रमुख गणेश चौधरी यांच्यासह कल्याण पश्चिमेतील अनधिकृत होर्डिंगचा विषय लावून धरणारे मनसे पदाधिकारी कपिल पवार , गणेश लांडगे यांच्यासह अनेक मनसैनिक आणि स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केडीएमसी आयुक्त चले जाव – मनसे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर
केडीएमसी आयुक डॉ. इंदू राणी जाखड यांनी महापालिकेत पदभार घेतल्यापासून इकडे काहीच केलेले नाहीये. या अत्यंत बेजबाबदार आयुक्त असून सायमन चले जावप्रमाणे आयुक्त चले जावची घोषणा आम्ही मनसेतर्फे देत असल्याची प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी यावेळी व्यक्त केली.

कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून नुकसाभरपाई मिळवून देणार – आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड

सहजानंद चौकातील या होर्डींग पडण्याच्या घटनेत योग्य प्रकारे हे होर्डींग लावण्यात आले नसल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी कंत्राटदारावर हलगर्जीपणा केल्याचा गुन्हा दाखल करून झालेल्या नुकसानाची भरपाई त्याच्याकडून वसूल करण्यात येईल अशी माहिती केडीएमसी आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली. तर संबंधित कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांना नोटीस बजावली जाईल असेही केडीएमसी आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले.

या घटनेला जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ घरी पाठवा – माजी सभागृह नेते श्रेयस समेळ
आपण सभागृह नेता असल्यापासून या अनधिकृत होर्डींगचा मुद्दा उचलून धरला आहे. तसेच शहरातील सर्व होर्डींगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करत आहोत. मात्र या घटनेला जबाबदार कंत्राटदारावर कारवाई करून चालणार नाही, तर या घटनेला जबाबदार असणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्यावर कारवाई करून त्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याची तसेच शहरातील सर्व अनधिकृत होर्डींग काढून टाकण्याची मागणी माजी सभागृह नेते श्रेयस समेळ यांनी यावेळी केली.

पाहा होर्डींग पडतानाचा लाईव्ह व्हिडिओ…
https://www.instagram.com/reel/C-KGWBqCxft/?igsh=YWxud2kxeXl2ejhy

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा