कल्याण दि. ११ मे :
संभाजी नगरच्या सभेसाठी कोणी फंडींग केलं, कोठून माणसे आली याची खबर आमच्याकडे आहे. ज्यांच्या सभा दुसऱ्याच्या जीवावर चालतात त्यांनी दुसऱ्यांवर टीका करू नये अशा शब्दांत शिवसेना प्रवक्त्या ॲड. मनिषा कायंदे यांनी मनसेला प्रत्युत्तर दिले आहे.
शिवसेनेच्या औरंगाबादमधील आगामी सभेच्या टिझरवर मनसे नेते गजानन काळे यांनी टीका करत शिवसेनेला चोरसेना असे संबोधले होते. याबाबत प्रसिध्दी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ॲड. मनिषा कायंदे यांनी हे प्रत्युत्तर दिले. राज्य महिला आयोगाच्या समिती सदस्यांनी कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाला भेट देत कामाचा आढावा घेतला.
आरोप करणे सोपे आहे, मात्र शिवसेना काम करणारा पक्ष आहे – मनसे आमदार राजू पाटील यांना टोला
डोंबिवलीजवळील देसलेपाडा गावातील खदानीत ५ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून भावनिक सादही घातली आणि परखड शब्दांत टीका केली आहे. त्यावर बोलताना ॲड. मनिषा कायंदे म्हणाल्या की ठाणे जिल्ह्याकडे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पूर्ण लक्ष आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई असून शासनाकडून त्यावर उपाययोजना सरू आहेत. नाशिक, पालघरमधील पाणी टंचाईची पाहणी करत आदित्य ठाकरे यांनी स्वतः जाऊन आवश्यक ती कार्यवाही केली आहे. पाणी समस्येवर बारीक लक्ष असून देसलेपाडासारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत. पाणी हा ज्वलंत प्रश्न असून यासाठी सगळेच जण झटत आहेत. पालकमंत्र्यांचे लक्ष नाही असा आरोप करणे सोपे आहे. मात्र काम करून दाखवले पाहिजे आणि शिवसेना काम करणारा पक्ष असल्याचे सांगत ॲड. मनिषा कायंदे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांना प्रत्युत्तर दिले आहे.
वारंवार मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राची सुरु असलेली बदनामी शिवसैनिक खपवून घेणार नाही
भाजपा खासदार नवनीत राणा यांचे लीलावती रुग्णालयातील एमआरआय करतानाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. लीलावती रुग्णालयात करण्यात आलेले स्कन आहे की स्कम आहे, सकाळपासून सर्व दिनचर्या व्हायरल करणाऱ्या राणा याचे रिपोर्ट का व्हायरल करत नाहीत असा सवाल ॲड. मनीषा कायंदे यांनी यावेळी केला. तर राणा यांचा खरच एमआरआय झाला आहे का याची चौकशी करण्याची मागणी करत शिवसेनेच्या वतीने पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. वारंवार मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राची सुरु असलेली बदनामी शिवसैनिक खपवून घेणार नाही असा इशाराही कायंदे यांनी यावेळी दिला.