डोंबिवलीत झालेल्या सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या राज्यस्तरीय उद्योजकता परिषदेला उपस्थिती
डोंबिवली दि. 14 सप्टेंबर :
एकीकडे आपण मराठी उद्योजक मोठा करण्याची भाषा करतो, वेदांता गुजरातला गेला म्हणून बोंबाबोंब करतोय. पण दहा लाख कर्मचारी असणाऱ्या एका दिग्गज मराठी उद्योजकाला महविकास आघाडी सरकारने कशी वागणूक दिली असा संतप्त प्रश्न विचारत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकार आणि आदित्य ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कल्याण चॅप्टरतर्फे इंजिनीअर्स डे च्या पूर्वसंध्येला सावित्रीबाई फुले नाट्यगृहात आयोजित राज्यस्तरीय उद्योजक परिषदेत ते बोलत होते.
अनेक हणमंतराव गायकवाड आणि मनोज पाटील निर्माण झाले पाहिजेत…
राज्यात मोठे प्रकल्प आले पाहिजेत त्याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. वेदांतासारखे प्रोजेक्ट आले पाहिजेत, कालच आपल्याला जर्मनीचे एक शिष्य मंडळ भेटले असून त्यांच्या उद्योगवाढीतूनही लाखो लोकांना रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्रात अनेक हणमंतराव गायकवाड आणि मनोज पाटील निर्माण झाले पाहिजेत आणि यासाठी महाराष्ट्र शासन काम करणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे…
हणमंत राव हुशार आहेत, मागच्या अडीच वर्षांत मी त्यांना खूप सहकार्य केले पण ते का केले हे कधी तरी आपण पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला सांगा. आज जे उद्योजकांना मोठे करण्यासाठी युवा पिढीला आनंद देण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहेत, ते हणमंतराव गायकवाड यांच्याशी कसे वागले? ते कधी तरी प्रेस घेऊन सांगा म्हणजे कळेल की खायचे दात कसे आहेत? आणि दाखवायचे दात कसे आहेत अशा शब्दात उदय सामंत यांनी नाव न घेता विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.
तर आज पत्रकार परिषदा घेणारे अनेक लोकं अडचणीत येतील..
आपण त्यांना मदत करून कोणतीही मेहेरबानी केली नाही. आपण तर त्यांना पहिल्यांदा पाहिले होते. ते एका सर्व सामान्य उद्योजकाप्रमाणे माझ्यासमोर येऊन बसले होते. त्यावेळी काही लोकांनी सांगितले की यांच्याकडे दहा लाख लोक काम करतात. तोपर्यंत मला त्यांच्याबद्दल कोणतीही कल्पना नव्हती. त्यांनी मला त्यावेळीं जे झालं ते सांगितले ते जर आता मी सांगितले तर आज पत्रकार परिषदा घेणारे अनेक लोकं अडचणीत येतील असे सूचक वक्तव्यही त्यांनी यावेळी केले.
दिग्गज मराठी उद्योजकाच्या पदरी काय आले..?
आपण मराठी उद्योजक मोठा करण्याची भाषा करतो वेदांता गुजरातला गेला म्हणून बोंबाबोंब करतो पण एखादा मराठी माणूस जो राष्ट्रपती भवनापासून एअरपोर्टपर्यंत सर्व यंत्रणा मराठी माणूस राबवत असेल तर त्याच्यासोबत राज्य सरकारने कसे वागले पाहिजे? हे देखील ठरवून घेण्याची गरज असल्याचे मत मंत्री उदय सामंत यांनी यावेळी व्यक्त केले..
मराठी उद्योजकांना ताकद देण्यासाठी काही तरी करायचे आहे…
तुमचे जे स्लोगन आहे की एकमेका सहाय्य करू अवघे होऊ श्रीमंत यामध्ये मला घेऊ नका नाही तर जो हणमंतराव गायकवाड यांना त्रास झाला तो तुम्हाला सर्वांना होऊ शकतो अशी मिश्किल टिप्पणी करताच उपस्थित उद्योजकांमध्ये एकच हशा पिकला. यातून आपल्याला बाहेर काढल्यावर सतत जाणीव राहील की मराठी माणसासाठी काही तरी करायचे आहे. मराठी उद्योजकांना ताकद देण्यासाठी काही तरी करायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
शिंदे साहेबांनी केलेला उद्योग चांगला होता की वाईट..?
आपण सहसा शब्द देत नाही आणि दिला तर काहीही झालं तरी पूर्ण केल्याशिवाय गप्प बसत नाही. मग चूक असलो की बरोबर असलो आणि त्याची किती का किंमत मोजावी लागली तरी आपण तो पूर्ण करत असल्याचे सामंत म्हणाले. तसेच आज संकल्प करण्याचा दिवस असून ज्या मराठी माणसाने या मराठी उद्योजक जगताला पुढे नेले त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार आहोत की नाही? म्हणून कार्यक्रमाला येताना आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली त्यावेळी त्यांनी सांगितले की तुम्ही जो शब्द द्याल तो मुख्यमंत्री म्हणून मी पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मग मला सांगा की शिंदे साहेबांनी केलेला उद्योग चांगला होता की वाईट होता? असा सवाल विचारल्यानंतरही उपस्थितांमध्ये जोरदार हास्याचे फवारे उडाले.
मीच शहाणा आहे असे वाटले की सगळ्यांचे वाटोळे होते…
एखाद्या मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला वाटायला लागले की मीच शहाणा आहे की सगळ्यांचे वाटोळे होते. त्यामुळे येत्या 15 दिवसांत महाराष्ट्रातील उद्योजकांना कशाप्रकारे ताकद द्यायची आहे याच्यासाठी थिंक टँक बनवले जातील असे आश्वासान देत नुसते माझ्याकडे या , माझ्याशी चर्चा करा, माझ्या अँटी चेंबरमध्ये या असले काही होणार नसल्याचा शाल जोडीतील टोलाही उदय सामंत यांनी लगावला.
आमच्याकडुन आणि अधिकाऱ्यांकडून काहीही त्रास होणार नाही..
उद्योजक जर आमच्या तब्येतीची काळजी घेतात तर उद्योजकांची काळजी घेणे तब्येत बिघडावी म्हणून आमच्याकडुन आणि आमच्या अधिकाऱ्यांकडून काहीही होणार नसल्याचे मंत्री सामंत यांनी सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आमच्याकडे भरपूर काही गोष्टी आहेत, संपूर्ण खाते समजले असे नाही. मात्र अनेक गोष्टी समजल्या आहेत. मागे काय झालं पुढे काय होणार हे सगळे कळले. ज्या ज्या वेळी काढायच्या त्यावेळी बरोबर बाहेर काढतो. मात्र यापूर्वी जे काही झाले कोणी काय केले ते सर्व इतिहास जमा झाले. आमच्याकडुन उद्योजकांना त्रास, ससेहोलपट, मानसिक छळ होणार नाही, ही जबाबदारी उद्योग खात्याने सर्व अधिकाऱ्यांनी स्वीकारली पाहिजे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान या बैठकीला बी व्हि जी ग्रुपचे अध्यक्षीय संचालक हणमंत राव गायकवाड यांच्यासह डॉ. नामदेव राव भोसले, एम एस एमई चे पी. एम पार्लेवार आदी मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. तर या कार्यक्रमाला सॅटर्डे क्लबचे ट्रस्टी रविंद्र प्रभुदेसाई, डॉ. अजित मराठे, प्रदीप ताम्हाणे, विजय परांजपे, बोर्ड ऑफ डायरेक्टर संतोष पाटील, सेक्रेटरी जनरल विनीत बनसोडे, कल्याण चॅप्टरचे राजेश चौधरी यांच्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक उद्योजक उपस्थित होते.