
पहलगाम हल्ल्यात मरण पावलेल्या डोंबिवलीतील हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांची घेतली भेट
डोंबिवली दि.27 एप्रिल :
पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या पर्यटकांना शहीदांचा दर्जा देऊन त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरी देण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांनी आज केली. (those killed in the Pahalgam attack be given martyr status and one of their family members be given a government job – Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party leader Vinayak Raut)
काश्मिरच्या पहलगाम जिल्ह्यात झालेल्या भ्याड अतिरेकी हल्ल्यामध्ये देशाच्या विविध भागांतील 25 हून अधिक पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना गेल्या बुधवारी घडली. मृत्युमुखी पडलेल्या या पर्यटकांमध्ये डोंबिवलीतील 3 व्यक्तींचाही समावेश असून त्यापैकी दिवंगत हेमंत जोशी यांच्या कुटुंबियांची माजी खासदार विनायक राऊत यांनी आज भेट घेतली. त्यानंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही मागणी केली.
काश्मिरच्या पहलगाम जिल्ह्यात इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित असूनही त्यांच्या सुरक्षिततेची कोणतीही व्यवस्था का करण्यात आली नाही असा प्रश्न उपस्थित करत पहलगाम इथला अतिरेकी हल्ला हा संपूर्णपणे केंद्र सरकारचे अपयश असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. केंद्र सरकारकडून केवळ 370 कलम हटवल्याचा ढोल बडवला जात असला तरी काश्मीरमध्ये आजही पाकिस्तान आणि त्याच्या दहशतवाद्यांचे वर्चस्व दिसत असल्याची गंभीर टिका करत या दहशतवाद्यांना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची जहरी टीकाही विनायक राऊत यांनी यावेळी केली.
यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते माजी खासदार विनायक राऊत, राजन विचारे, शिवसेना उपनेते विजय साळवी, कल्याण जिल्हा प्रमुख दिपेश म्हात्रे, जिल्हा संघटक तात्या माने, वैशाली दरेकर, शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे, अभिजीत सावंत , राहुल म्हात्रे, विलास म्हात्रे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.