Home ठळक बातम्या म्हाडा सोडतीतील ती घरे नियमानुसारच; म्हाडाकडून छाया राठोड यांना क्लिनचिट

म्हाडा सोडतीतील ती घरे नियमानुसारच; म्हाडाकडून छाया राठोड यांना क्लिनचिट

 

मुंबई दि.25 मे :
डोंबिवलीजवळील खोणी येथे सुरू असणाऱ्या म्हाडाच्या प्रकल्पाच्या सोडतीत कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट करत म्हाडा प्रशासनाने कर्मचारी छाया राठोड यांना क्लिनचिट दिली आहे. कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांनी म्हाडा सोडतीमध्ये भ्रष्टाचार झाल्यासह कर्मचारी छाया राठोड यांनी आपल्या नातेवाईकांना घरे मिळवून दिल्याचा आरोप केला होता. मात्र त्यावर झालेल्या सुनावणीदरम्यान म्हाडाचे मुख्याधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत तक्रार निकाली काढली आहे.

डोंबिवलीजवळील खोणी येथे म्हाडाच्या सदनिकांचे काम सुरू आहे. त्यातील गोल्डन ड्रीम प्रोजेक्टमधील ऑर्किड इमारतीच्या एकाच सोडतीत म्हाडा कर्मचारी छाया राठोड यांच्या 7 नातेवाईकांना घरे मिळाल्याचा आरोप करत या प्रक्रियेत घोटाळा झाल्याची शंका उपस्थित केली. तसेच आमदार पाटील यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठवत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली. त्यानूसार मुख्य अधिकारी डॉ. नितीन महाजन यांनी या प्रकरणाची चौकशी केली. ज्यामध्ये म्हाडा कर्मचारी छाया राठोड यांचे 7 नव्हे तर 3 नातेवाईक म्हाडा सोडतीमध्ये विजेते असून त्यांनी सर्व अटी आणि नियमांचे पालन करूनच सदनिकेचा ताबा घेतल्याचे डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले. तसेच सदनिका सोडतीसाठी वापरली जाणारी संगणक प्रणाली पारदर्शी आणि सुरक्षित असून कोणत्याही मानवी हस्तक्षेपास त्यात वाव नसल्याचेही डॉ. महाजन यांनी आपल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

हे सर्व आरोप बिनबुडाचे – छाया राठोड
तर स्थानिक आमदारांनी केलेला हा दावा म्हणजे महिला कर्मचाऱ्यासह म्हाडाला बदनाम करण्याचा डाव असल्याची प्रतिक्रिया छाया राठोड यांनी दिली आहे. हे सर्व आरोप बिनबुडाचे असून आपण २०११ पासून दरवेळी सोडतीमध्ये स्वतःचे नशीब आजमावण्यासाठी लॉटरीमध्ये फॉर्म भरत आहे. तर आमदारांनी हे आरोप का लावले हेच अजूनपर्यंत समजलेले नाही. त्यांच्याशी माझा दुरपर्यंत संबंध नसून ह्या मागे नक्कीच दुसरं काहीतरी कारण असण्याची शक्यता जास्त असल्याचेही छाया राठोड यांनी सांगितले.

तसेच आपले पती राजेश राठोड यांनी खोणी येथील स. क्र.134 आणि स. क्र. 135 येथील गुरचरण जमिनीवर सुरु असलेल्या अनधिकृत डम्पिंग ग्राउंड , अनधिकृत बांधकामाविरोधात मा. उपविभागीय आयुक्त, कल्याण यांच्याकडे तक्रार दाखल केली असून त्यातून हा प्रकार घडला असावा. त्यामुळे आमच्या समाजाच्या काही जणांना म्हाडाची लॉटरी लागणे हा निव्वळ योगायोग असल्याचेही छाया राठोड यांनी स्पष्ट केले आहे.

१ कॉमेंट

  1. मा. महोदय यांना विनंती आहे की, गरीब जनतेला टार्गेट करण्यापेक्षा खोणी गावातील गट क्र 134व 135 वरील डम्पिंग ग्राउंड व अनधिकृत बांधकाम यावर कारवाई करयासाठी मा. जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार करावा. मा. आम यांच्या कडे आम्ही रहिवासी फेब्रुवारी 22, 2020 ला निवेदन दिलेलं आहे. बंजारा समाजाला जाणूनबुजून टार्गेट केल जातंय.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा