येत्या सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी साई चौकात आयोजन
कल्याण दि.१९ ऑक्टोबर :
भारतीय जनता पार्टी आणि कपिल पाटील फाऊंडेशनच्या वतीने कल्याणमधील साई चौकात येत्या सोमवारी २४ ऑक्टोबर रोजी दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील १३ हून अधिक दिग्गज गायक आणि कलाकारांच्या उपस्थितीत कल्याणकर रसिकांना सूरांच्या वर्षावात दिवाळीचे स्वागत करता येणार आहे.
कल्याण पश्चिमेच्या खडकपाडा येथील साई चौकात सोमवारी पहाटे पाच वाजता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, सावनी रविंद्र, प्रसिद्ध कलाकार अमृता खानविलकर, नेहा पेंडसे यांच्यासह नम्रता संभेराव, चेतना भट, समिरा गुजर, वनिता खरात, गौरव मोरे, प्रसाद खांडेकर, श्याम राजपूत आदी कलाकारांचे कलाविष्कारही रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला नाही. यंदा मात्र अपूर्व उत्साहात त्याचे आयोजन करण्यात आले असून त्याला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी केले आहे.