मनसे आमदार राजू पाटील यांच्या माध्यमातून पुन्हा सुरु झाला वीजपुरवठा
कल्याण ग्रामीण दि.13 ऑगस्ट :
ठाणे जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या संदप गावातील शाळेचा वीजपुवठा गेल्या १५ वर्षांपासून खंडित करण्यात आला होता. वीजबिल न भरल्याने महावितरणकडून शाळेचे वीजमीटर काढून नेण्यात आले होते. मात्र संदप गावातील समाजसेवक संदीप पाटील आणि ॲड. तृप्ती पाटील यांनी आमदार राजू पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली होती. त्यानंतर आमदार राजू पाटील यांनी तातडीने आपल्या आमदारकीच्या पगारातून हे थकलेले वीजबिल भरून स्वातंत्र्यदिनाच्या पूर्व संध्येला ही शाळा पुन्हा प्रकाशमान केली आहे.
कल्याण ग्रामीण भागात संदप गावातील ठाणे जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण हे विजेविनाच सुरु होते. शाळेचे वीजबिल हे अधिकचे थकल्यामुळे महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याने त्याशिवायच विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू होते. याबाबत संदप गावातील शिक्षणप्रेमी संतोष पाटील आणि ऍड. तृप्ती पाटील यांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. त्यावर आमदार पाटील यांनी तातडीने आपल्या आमदारकीच्या पगारामधून सहकारी योगेश पाटील(संदप), प्रवीण पाटील यांच्या माध्यमातून या थकलेल्या रकमेचा धनादेश महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला.
तर वीज बिलाची थकबाकी भरल्यानंतर महावितरणकडून रविवारी सुट्टीच्या दिवशीही या ठाणे जिल्हा परिषद शाळेचा वीजपुरवठा सुरू करून देण्यात आला. त्यामुळे गेल्या १५ वर्षांपासून अंधारात असलेली ही शाळा यंदा स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला प्रकाशमान झाली आहे.
तर महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशीही दाखवलेल्या कार्यतत्परतेबद्दल शिक्षणप्रेमी संतोष पाटील, ऍड तृप्ती पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने महावितरण कर्मचाऱ्यांचे स्वागत करत आमदार राजू पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत.