कल्याण दि.21 सप्टेंबर :
जबरी चोरी, बाईक चोरी आणि चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील दोघा अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात कल्याणच्या खडक पाडा पोलिसांना यश आले आहे. या चोरट्यांच्या चौकशीतून वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल असलेले चोरीचे तब्बल 18 गुन्हेही उघड झाले असून चोरीला गेलेल्या 11 महागड्या बाईकही हस्तगत करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे मुंबईत केलेल्या लुटीच्या गुन्ह्यांनंतर हे चोरटे मुंबई पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटले होते.
काही दिवसांपूर्वी कल्याणजवळील आंबिवली परिसरात राहणाऱ्या महिलेची सोन्याची चेन खेचून दोघे बाईकस्वार पसार झाले होते. मात्र हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने खडकपाडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद जिने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी अनिल गायकवाड यांनी सीसीटीव्हीच्या आधारे या प्रकरणाचा तपास सुरू केला.
त्याच्याआधारे खडकपाडा पोलिसांनी सापळा रचून आंबिवलीत राहणाऱ्या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीमध्ये त्यांनी दिलेल्या माहितीवरून खडकपाडा पोलिसांना धक्काच बसला. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, मुंब्रा, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, नवी मुंबईसह मुंबई शहरात आपण जबरी चोरी आणि मोटार सायकल चोरी केल्याची कबुली त्यांनी दिल्याची माहिती कल्याणचे डी सी पी सचिन गुंजाळ यांनी दिली.
या कबुलीच्या आधारे खडकपाडा पोलिसांनी सुमारे 10 लाख किमतीच्या चोरीच्या महागड्या बाईक आणि 60 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन असा ऐवज हस्तगत केला आहे. तर या टोळीच्या म्होरक्याचा कसून शोध घेण्यात येत असून लवकरच त्यालाही गजाआड केले जाईल असा विश्वास यावेळी डी सी पी सचिन गुंजाळ यांनी यावेळी व्यक्त केला.
दरम्यान या दोघा अट्टल गुन्हेगारां मुंबई पोलीसही शोध घेत होते. मुंबईच्या चुनाभट्टी परिसरात केलेल्या लुटीच्या प्रकारानंतर ते मुंबई पोलिसांच्या हातून थोडक्यात निसटले होते. मात्र खडकपाडा पोलिसांनी या चोरट्यांना अटक करत विविध गुन्हे उघड केले आहेत.