Home Uncategorised म्हणून राज्याला अधोगतीकडे नेणारे महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले – मुख्यमंत्री एकनाथ...

म्हणून राज्याला अधोगतीकडे नेणारे महाविकास आघाडी सरकार उलथवून टाकले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हल्लाबोल

महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निर्वाळा

कल्याण दि.13 नोव्हेंबर :
महाविकास आघाडीच्या सरकारने अडीच वर्षांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला अधोगतीकडे नेण्याचे काम केल्यानेच आम्ही हे महाराष्ट्रविरोधी सरकार उलथवून टाकले अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे, काँग्रेस आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला. तर या सभेला झालेली प्रचंड गर्दी पाहता महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचा विजय निश्चित असल्याची खात्रीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
(Therefore, the Maha Vikas Aghadi government, which was leading the state to decline, was overthrown, Chief Minister Eknath Shinde’s attack)

कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार विश्वनाथ भोईर यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणात आले होते. येथील स्व. यशवंतराव चव्हाण क्रीडांगण येथे झालेल्या महाविजय संकल्प सभेमध्ये ते बोलत होते. या सभेचे वैशिष्ट्य ठरले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे भाषण ऐकण्यासाठी लाडक्या बहिणींनी केलेली प्रचंड गर्दी. ही सभा झालेले क्रीडांगण या लाडक्या बहिणींनी अक्षरशः फुलून गेले होते.

महाविकास आघाडीच्या काळामध्ये महाराष्ट्र देशामध्ये तिसऱ्या स्थानावर फेकला गेला होता. मात्र महायुतीचे सरकार आल्यावर आम्ही अवघ्या सहा महिन्यात हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उद्योग व्यवसाय, गुंतवणूक, स्टार्टअप,पायाभूत सुविधा अशा प्रमुख क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणला. त्यासाठीच आम्ही राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकल्याचे सुतोवाच मुख्यंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तर लोकसभेतील फेक नरेटीव्ह आता चालणार नाही. जे संविधान बदलाची ओरड करत होते त्या काँग्रेस पक्षानेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पराभव करत खूप त्रास दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

तर आपल्याला अजिबात हलक्यात घेऊ नका, शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्य बाण ज्यांनी काँग्रेसच्या दावणीला बांधले, ते महाविकास आघाडीचे सरकार आपण उलथवून टाकले. जर का असे केले नसते तर कल्याण पश्चिमसह संपूर्ण महाराष्ट्रात विकासकामांची गंगा आज निर्माण झाली नसती. तर येत्या काळात कल्याण पश्चिमेतील मेट्रोचे कामही लवकर सुरू होईल अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याणकर नागरिकांना आश्वस्त केले.

मुख्यमंत्र्यांकडून डायलॉगच्या माध्यमातून विश्वनाथ भोईर यांचे कौतुक…
या जाहीर सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चित्रपटातील जली को आग कहते है, बुझी को राख कहते हैं, और जिस राख से बारुद बनता हैं उसे विश्वनाथ कहते हैं अशा सुप्रसिद्ध डायलॉगच्या माध्यमातून महायुती उमेदवार विश्वनाथ भोईर यांचे कौतुक केले. तसेच या सभेला झालेली तुफान गर्दी पाहता विश्वनाथ भोईर यांचा विजय म्हणजे काळया दगडावरची भगवी रेघ असल्याचे सांगतानाच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाफील न राहण्याचेही आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केले. तर राज्यामधील महिला भगिनींकडे जो वाकड्या नजरेने बघेल त्याचे बदलापूरच्या नराधमासारखेच परिणाम होतील अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला वर्गाला संबोधित करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. तर भाजप माजी आमदार नरेंद्र पवार, वरुण पाटील यांचे महायुती धर्म पाळण्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी दोघांचेही जाहीर अभिनंदन केले.

फक्त विकास विकास आणि विकास हेच धोरण…
कल्याणमध्ये विविध शासकीय संस्थांच्या माध्यमातून 2 हजार 40 कोटींची विकासकामे सुरू आहेत. ही काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंतचा थोडी कळ सोसा. तर आधीच्या सभेमध्ये दिलेले कुशावली धरण, मुंबईच्या धर्तीवर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, विकासाच्या मुद्द्यावर जनतेसमोर, कल्याण पश्चिम विकास पाहता ती महायुती पाठीमागे उभी राहील आणि भरघोस मतांनी निवडून देईल असा विश्वास उमेदवार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केला.

या सभेला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी मंत्री कपिल पाटील, कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ (आप्पा) शिंदे, माजी आमदार नरेंद्र पवार, उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, शिवसेना उपनेत्या विजया पोटे, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, भाजप जिल्हाध्यक्ष नाना सुर्यवंशी, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अरविंद मोरे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, शिवसेनेचे शहराध्यक्ष रवी पाटील, संजय पाटील, महिला संघटक छायाताई वाघमारे, विधानसभा संघटक मयूर पाटील, माजी महापौर वैजयंती घोलप, माजी नगरसेवक प्रभूनाथ भोईर, श्रेयस समेळ, विद्याधर भोईर, गणेश जाधव, वैशालीताई भोईर, सुनील खारूक, रामदास कारभारी, युवासेनेचे सुचेत डामरे, प्रतीक पेणकर यांच्यासह महायुतीच्या मित्रपक्षातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा