Home कोरोना तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होण्याच्या शक्यतेला शास्त्रीय आधार नाही – बालरोग...

तिसऱ्या लाटेत लहान मुलांना त्रास होण्याच्या शक्यतेला शास्त्रीय आधार नाही – बालरोग तज्ञ डॉ. आनंद इटकर

 

कल्याण दि.1 जुलै :
कोवीडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलं अधिक बाधित होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी त्याला कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार नसल्याचे मत कल्याण डोंबिवली कोवीड टास्क फोर्समधील बालरोगतज्ज्ञ डॉ. आनंद इटकर यांनी व्यक्त केले. आज असलेल्या ‘डॉक्टर्स डे’चे औचित्य साधून गुरुकुल क्लासेसचे सीईओ वैभव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी भाग्यश्री ठाकरे यांनी डॉ. इटकर यांच्याशी संवाद साधला.

आतापर्यंतच्या दोन्ही लाटांमध्ये लहान मुलांना कोवीडची बाधा झाली असली तरी त्याची गंभीरता कमी होती. फार कमी मुलं यामध्ये आजारी पडली किंवा रुग्णालयात दाखल झाली. मात्र या लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींना कोवीडची लागण होण्याचीच शक्यता सर्वाधिक असून इतर आजारांप्रमाणे कोवीडलाही हद्दपार करण्यासाठी अधिकाधिक लोकांचे परिणामकारक लसीकरण हाच सर्वोत्तम उपाय असल्याचे डॉ. इटकर म्हणाले.
तर कोवीड आजारावर आलेली लस ही जगाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात कमी वेळात तयार झालेली लस आहे. यापूर्वी आलेल्या महामारीसाठी एवढ्या कमी कालावधीत कोणतीही लस आलेली नाही. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी लस घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

तर कोणताही व्हायरस हा आपला ठराविक काळानंतर आपला गुणधर्म बदलत असतो. कोरोनाही त्याला अपवाद नाही. सध्या आपल्याकडे कोवीड रुग्ण कमी झाले असले तरीही कोवीड टाळण्यासाठी शासनाने आखून दिलेली नियमावली पालन करण्याला कोणताही पर्याय नाही. तर कोणत्याही आजाराला तोंड देण्यासाठी शरिरात नैसर्गिक प्रतिकारशक्तीसाठी पौष्टिक खाणे, व्यायाम आणि आपल्या शारीरिक क्षमतांचा अधिकाधिक वापर होणे आवश्यक आहे. केवळ कोरोनाच नव्हे तर कोणत्याही आजाराविरोधात लढण्यासाठी चौरस आहार अर्थात वरण-भात, भाजी-पोळी या घटकांचा जेवणात समावेश असल्याचेही डॉ. आनंद इटकर यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा