उद्योग – रोजगारासाठी कोणतेही प्रयत्न नसल्याचा हल्लाबोल
कल्याण दि.22 एप्रिल :
गेल्या दहा वर्षांत भिवंडी लोकसभा मतदारसंघात विकासाची कोणतीही कामे झाली नाहीत की कोणत्याही रोजगाराच्या नविन संधी निर्माण झाल्या नाहीत. उलटपक्षी इथला पॉवर लुम व्यवसाय बंद झाल्याने हजारो लोकं इकडून गुजरात आणि इतर राज्यांत स्थलांतरित झाल्याची टिका भिवंडी लोकसभेचे महविकास आघाडीचे उमेदवार सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे यांनी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्यावर केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कल्याण जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी कल्याणात महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.( There is no development work from Kapil Patil in Bhiwandi Lok Sabha – Mahavikas Aghadi candidate Suresh (Balya Mama) Mhatre)
केंद्रीय मंत्रीपद असूनही आज भिवंडी लोकसभा मतदारसंघात चांगले रुग्णालय नाही, चांगले रस्ते नाहीत की रोजगाराच्या नव्या संधी नाहीत. तर भिवंडीतील पॉवर लूम उद्योग स्थलांतरित होत असतानाही यांच्याकडून कोणतेच प्रयत्न झाले नाहीत. आजच्या घडीला आपण गोडाऊन व्यवसायातून तब्बल 90 हजारांहून अधिक जणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. आणि ज्यातून हा रोजगार उपलब्ध झालाय तीच गोडाऊन तोडण्यासाठी त्यांच्याकडून कारवाई केली जात असल्याचा हल्लाबोलही बाळ्या मामा यांनी यावेळी केला.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि या भागाचे खासदार कपील पाटील यांनी मागील दहा वर्षात विकासाची कोणतीही कामे केली नाहीत. जिल्ह्यातील रोजगाराचे केंद्र असलेल्या भिवंडीतील कपडा उद्योग बंद पडला. काही उद्योग गुजरात, अन्य राज्यात स्थलांंतरित झाले तरी खा. पाटील यांनी या उद्योगांच्या पुनर्जिवनासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत, अशी टीका भिवंडी लोकसभेतील महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांनी रविवारी येथे माध्यमांशी बोलताना केली.
भिवंडी परिसरात एकही चांंगला रस्ता नाही. सर्वोपचारी रुग्णालय नाही. लोकांना उपचारासाठी ठाणे, मुंबईत जावे लागते. निवडणुका जवळ आल्या की कपील पाटील फक्त कल्याण-मुरबाड-नगर रेल्वेचा विषय उकरून काढून त्या विषयी चर्चा घडवून आणतात. त्यांच्याकडून या विषयीचा पाठपुरावा होत नसल्याने हा मह्वाचा रेल्वे मार्ग रखडला आहे, अशी टीका बाळ्या मामा यांनी केली. वादळ आला की पालापाचोळा उडून जातो, तसेच चित्र आता भिवंडी लोकसभेत दिसून येईल अशा शब्दांत बाळ्या मामा यांनी कपिल पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले.