Home ठळक बातम्या महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवून माहिती मिळविण्याकडे ग्राहकांचा वाढता कल

महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवून माहिती मिळविण्याकडे ग्राहकांचा वाढता कल

कल्याण परिमंडलात ८७ टक्के ग्राहकांच्या मोबाईल क्रमांकाची झालीय नोंदणी

कल्याण दि. 7 ऑक्टोबर :
महावितरणकडे मोबाईल क्रमांक नोंदवून त्याद्वारे आपल्या वीज बिलासंदर्भात सविस्तर माहिती मिळविण्याकडे ग्राहकांचा मोठ कल असल्याचे दिसून येत आहे. कल्याण परिमंडलातील तब्बल २४ लाख ३६ हजार म्हणजेच ८७ टक्के ग्राहकांनी मोबाईल क्रमांकांची नोंद केल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे. (There is a great response of customers to get information by registering their mobile number with Mahavitran)

कल्याण परिमंडलात कृषिपंप ग्राहक वगळता घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक आणि इतर असे एकूण २८ लाख १० हजार वीजग्राहक आहेत. यातील जवळपास ८७ टक्के ग्राहक मोबाईल नोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडले गेले आहेत. या ग्राहकांना मीटर रीडिंग घेतल्यानंतर काही तासांच्या आत रिडींग घेतल्याची तारीख, वेळ, सध्याचे एकूण युनिट तसेच वापरलेले विजेचे युनिट याचा तपशील असणारा ‘एसएमएस’ महावितरणकडून पाठविण्यात येतो. यात विसंगती आढळल्यास तातडीने तक्रार करून बिलासंदर्भात निर्माण होणारे नंतरचे वाद टाळता येतात. तर वीजबिल तयार झाल्यानंतर बिलाची रक्कम आणि बिल भरण्याची अंतिम मुदत याची माहिती असणारा ‘एसएमएस’ ग्राहकांना पाठविला जातो. हा ‘एसएमएस’ बिल भरणा केंद्रावर दाखवून बिल भरता येते किंवा दिलेल्या लिंकच्या माध्यमातून ऑनलाईन बिल भरणा करता येतो.

मोबाईलद्वारे मिळते ही सर्व माहिती…

याशिवाय नियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणारा वीजपुरवठा व पुरवठा खंडित राहण्याचा कालावधी याची पूर्वसूचना ‘एसएमएस’ मार्फत दिली जाते. तांत्रिक किंवा इतर कारणामुळे वीज पुरवठा बंद झाला असल्यास त्याची माहिती, वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी लागणाऱ्या कालावधीची माहितीही या सुविधेतून मिळते. एखाद्या कारणास्तव मीटरचे रिडींग घेणे शक्य नसल्यास ग्राहकानेच मीटर रिडींग घेऊन ॲपद्वारे महावितरणला सादर करण्याबाबत तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित करण्याची पूर्वसूचनाही ‘एसएमएस’द्वारे देण्यात येते.

असा नोंदवा मोबाईल क्रमांक…
नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून MREG नंतर स्पेस द्यावा. त्यानंतर आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाईप करून 99303 99303 या क्रमांकावर ‘एसएमएस’ पाठवावा. या एका ‘एसएमएस’वरून ग्राहकाच्या मोबाईलची नोंदणी होते. याशिवाय महावितरणचे www.mahadiscom.in हे संकेतस्थळ किंवा मोबाईल ॲपवरूनही मोबाईलची नोंदणी करता येत असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली.

तसेच उर्वरित ग्राहकांनीही आपल्या मोबाईल क्रमांकांची नोंदणी करून उपलब्ध सुविधांचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा