खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून भव्य दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन
डोंबिवली दि.21 जानेवारी:
देशातील करोडो हिंदू बांधवांचे आराध्य दैवत असलेले प्रभू श्रीराम उद्या अयोध्येतील आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत आहे. त्याचे औचित्य साधून कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवलीतील संत श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलात १ लाख ११ हजार १११ अधिक दिव्यांच्या माध्यमातून प्रभू श्रीरामाची दिव्य आणि तेजस्वी अशी प्रतिकृती साकारण्यात आली. याची दखल घेत याची ऑल इंडिया रेकॉर्डमध्येही नोंद करण्यात आली आहे.(The world record of Lord Sri Rama’s light at Dombivli; Largest picture rangoli drawn through more than lakhs of lights)
कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळा निमित्त विविध अध्यात्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत आज डोंबिवली येथील संत सावळाराम महाराज क्रीडा संकुल येथे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दिव्यांच्या माध्यमातून रेखाटलेली सर्वात मोठी चित्र रांगोळी –
या दीपोत्सवात साकारण्यात आलेल्या प्रतिकृती मध्येअयोध्या मंदिरासह श्रीरामाचे सर्वात मोठे चित्र काढले. 160 फूट रुंदी 160 उंची एकूण 25600 चौरस फूट मध्ये 1,11,111 दिवे (तेल दिवे) वापरून जागतिक विक्रम प्रस्थापित केला. रांगोळी कलाकार चेतन राऊत आणि शिवसेना युवा टीम सदस्यांनी हे पोर्ट्रेट डिझाइन केले होते
भव्य रांगोळीवर हे दिप प्रज्वलन…
यावेळी प्रभू श्रीरामांसह मंदिराचीही अतिशय सुंदर अशी प्रतिकृती दिव्यांतून साकारण्यात आली. प्रभू श्रीरामांच्या काढण्यात आलेल्या भव्य रांगोळीवर हे दिप प्रज्वलन करण्यात आले. या अनोख्या तेजस्वी सोहळ्याचे शेकडो रामभक्त आणि डोंबिवलीतील सामाजिक संस्थांच्या अनेक प्रतिनिधींना याची देही याची डोळा साक्षीदार होण्याचे भाग्य लाभले. यावेळी 1 लाख 11 हजार 111 दिव्यांच्या माध्यमातून एका भव्य अशा इंडिया रेकॉर्डला गवसणी घालण्यात आली. यामध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही या दिप प्रज्वलनात सक्रीय सहभाग घेतला.
अद्भुत अशा अध्यात्मिक अनुभूतीचा अनुभव…
एकीकडे गदिमा रचित गीत रामायणातील अवीट गोडींच्या सुमधुर सुर आणि दुसरीकडे हे लक्ष दिवे प्रज्वलित करण्यासाठी उसळलेला रामभक्तांचा जनसागर. संध्याकाळी साडे पाच वाजल्यापासून डोंबिवली आणि आसपासच्या परिसरातील शेकडो रामभक्तांची पावले संत श्री सावळाराम महाराज क्रिडा संकुलाकडे वळू लागली होती. ज्यामध्ये तरुण वर्गासह महिला भगिनींचीही लक्षणीय संख्या होती.
काशी येथील ब्रह्मवृंदांच्या स्वरघोषात महाआरती…
या भव्य दिपोत्सवाप्रमाणे याठिकाणी झालेल्या महाआरतीनेही उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या महा आरतीसाठी वाराणसीच्या काशी येथील 32 ब्रह्मवृंदांची उपस्थिती होती. ज्याप्रमाणे काशी येथे गंगा आरती केली जाते त्याच धर्तीवर डोंबिवलीच्या या क्रिडा संकुलात ही महा आरती संपन्न झाली. त्यापूर्वी झालेल्या अतिशय नयनरम्य अशा फटाक्यांच्या आतिषबाजीने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.
समस्त कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्युत रोषणाई…
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते कल्याण लोकसभेतील विद्युत रोषणाईचेही प्रज्वलन करण्यात आले. कल्याण डोंबिवलीसह मतदार संघामध्ये दहा प्रमुख ठिकाणी ही विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
प्रभू श्रीरामांच्या मंदिराच्या माध्यमातून इतिहास पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाण्याचे काम – खासदार डॉ. श्रीकांत शिंदे
अगोदर आपल्याला झोपडीमध्ये प्रभू श्रीरामाचे दर्शन घ्यावे लागायचे. मात्र आता यापुढे भव्य मंदिराचे आपले स्वप्न साकार होत असून संपूर्ण देशात आनंदाचे, उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत उभारण्यात आलेल्या या प्रभू श्रीराम मंदिराच्या माध्यमांतून आपली संस्कृती आणि इतिहास नव्या पिढीपर्यंत नेण्याचे काम होईल असा विश्वास यावेळी खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.