संध्याकाळच्या पश्चिमेकडील जोरदार वाऱ्यांची मदत
कल्याण डोंबिवली दि. 20 एप्रिल :
गेल्या आठवडाभर कल्याण डोंबिवलीसह संपूर्ण ठाणे जिल्ह्याला होरपळून काढणाऱ्या तापमानात आज अपेक्षेप्रमाणे घट पाहायला मिळाली. परिणामी मुरबाड वगळता कल्याण डोंबिवलीसह ठाणे जिल्ह्यात आज ३९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. संध्याकाळच्या सुमारास पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे तापमान कमी राहण्यास मदत होत असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. ( The temperature of Thane district along with Kalyan Dombivli has started to decrease)
गेला आठवडा म्हणजे संपूर्ण ठाणे जिल्ह्यासाठी जणू काही अग्निपरीक्षा घेणारा ठरला. त्यातही गेले दोन दिवस तर तापमानाने अक्षरशः कहर केला. हे दोन्ही दिवस लागोपाठ कल्याण डोंबिवली आणि ठाणे जिल्ह्याचा पारा ४३ अंशांच्या जवळ पोहोचल्याचे दिसून आले. त्यामुळे हे दोन दिवस लोकांच्या संयमाची परीक्षा पाहणारे ठरले.
मात्र आता हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे आजपासून तापमानात क्रमिक घट होण्यास सुरुवात झाली आहे. तर मुरबाड (४१) वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी ३८ ते ३९.८ अंश सेल्सिअस पर्यंत तापमान नोंद झाल्याचे अभिजित मोडक यांनी सांगितले. तसेच संध्याकाळच्या वेळेस पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळेही नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे.
आज नोंद झालेले तापमान…
कल्याण ३९.६
डोंबिवली ३९.२
बदलापूर ३९.८
मुरबाड ४१
विरार ३६.७
मीरा रोड ३६.८
मुंबई ३७.३
नवी मुंबई ३८.२
मुंब्रा ३८.२
ठाणे ३८.४
पनवेल ३९
कर्जत ४१