कल्याण दि.3 जुलै :
गेल्या दिड वर्षांहून अधिक काळापासून असलेल्या कोवीडमूळे सर्वांचेच आयुष्य बदलून गेले आहे. ‘अनेकांचे तर होत्याचे नव्हते झाले असून अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तीही गमावल्या. मात्र या कोवीड काळात असेही काही जणं आहेत जे आपल्या जीवाची पर्वा न करता लोकांच्या मदतीला धावून आले. कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे त्यापैकीच एक. म्हणूनच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल थेट लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस्ने घेतली आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सतर्फे नुकतेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कोवीडच्या पहिल्या लाटेपासून ते आजपर्यंत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी अनेक असे सामाजिक उपक्रम राबवले. विशेषतः कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे संक्रमण वाढत असताना इथली महापालिकेची आरोग्य यंत्रणा तोकडी पडली होती. अशावेळी कोरोनाबाधित रुग्णांना स्थानिक पातळीवर आणि वेळेत उपचार मिळण्यासाठी आरटीपीसीआर चाचण्यांसाठी प्रयोगशाळा आणि जंबो कोविड रुग्णालय उभारण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. आणि हीच बाब कल्याण डोंबिवलीतील कोरोना रुग्णांच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी ठरली.
एकीकडे रुग्ण वाढत असताना जम्बो कोवीड उपचार सुविधांमुळे कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांना आवश्यक वेळेमध्ये योग्य ते उपचार मिळू शकले. एखाद्या खासगी रुग्णालयातील सुविधांनाही लाजवेल इतक्या चांगल्या पद्धतीने ही कोवीड सेंटर्स कार्यान्वित झाली. आरोग्य सुविधांबरोबरच दिल्लीत युपीएससी परिक्षेच्या तयारीसाठी गेलेल्या आणि कोरोना काळात तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील शेकडो विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी आणणे असो की कोरोना लॉकडाऊनमध्ये नोकरी, व्यवसाय गमावलेल्या आणि हातावर पोट असलेल्या नागरिकांसाठी खासदार शिंदेंकडून आवश्यक तो सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
आपल्या मतदारसंघात मदतीचा ओघ सुरू असताना दुसरीकडे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या वतीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आल्या. तसेच महाराष्ट्रातील पत्रकार, पोलिस तसेच सफाई कर्मचारी बांधव यांची मोफत कोवीड चाचणी करण्यात आली. यासारखे असंख्य उपक्रम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी या कोवीड काळात राबवले ज्याची दखल घेत वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडनतर्फे नुकतेच त्यांचा प्रमाणपत्र गौरव करण्यात आला.
याबद्दल बोलताना आपण हा पुरस्कार सर्व कोविड योध्दा, आरोग्य कर्मचारी, पॅरामेडीकल कर्मचारी, पोलिस आणि सर्व फ्रंट लाईन वर्कर्सना समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया खासदार डॉ. शिंदे यांनी दिली. तसेच आपल्या सामाजिक कार्याची दखल घेत सन्मानित केल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडनचेही त्यांनी आभार मानले आहेत.