Home ठळक बातम्या कोयना एक्सप्रेस पकडण्यासाठी होणारी कल्याणातील प्रवाशांची धावपळ अखेर थांबली

कोयना एक्सप्रेस पकडण्यासाठी होणारी कल्याणातील प्रवाशांची धावपळ अखेर थांबली

 

माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पाठपुराव्याला यश

कल्याण दि.25 ऑक्टोबर :
कोयना एक्सप्रेसचे डबे आता क्रमाने उपलब्ध करून दिल्याने कल्याणमधील कोयना एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धावपळ थांबली असून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे.
मुंबई कोल्हापुर (कोयना एक्सप्रेस) ह्या गाडीची बोगी रचना इंजिनपासून क्रमाने लागत नसल्याने कल्याणमधील प्रवाशांची मोठी धावपळ होण्यासह प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत होता.

कोयना एक्स्प्रेस ही गाड़ी सकाळी ९.४० च्या सुमारास कल्याणच्या ४ नंबर प्लॅटफॉर्मवर येते. त्यापूर्वी सकाळी ९.३० ला पुष्पक एक्सप्रेसही त्याच प्लॅटफॉर्मवरुन सुटते. या दोन्ही गाड्यांमध्ये अवघे दहा मिनिटांचे अंतर असून कोयनाच्या प्रवाशांमध्ये सेकंड क्लासचे प्रवासी जास्त असतात. कधी कधी काही जणांचे आरक्षण D-5 मध्ये असते आणि हा डबा एकदम शेवटी येतो. तर त्यांच्यापैकी काही जणांचे आरक्षण D-6 मध्ये असते आणि हा डबा एकदम पुढे येतो. त्यामूळे अगदी १० मिनिटात या प्रवाशांना आपापला डबा पकडण्यासाठी रोज पुढे मागे धावावे लागते. अनेकदा हे डबे शोधण्यात वेळ जात असल्याने अनेकदा काही प्रवाशांची गाडी सुटत होती.

याबाबत कल्याणातील प्रवाशांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांच्याकडे ही कैफियत मांडली. नरेंद्र पवार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची मुंबई दौऱ्यात भेट घेऊन कल्याणातील प्रवाशांच्या या अडचणी मांडल्या. त्यावर रेल्वे राज्यमंत्री दानवे यांनी तातडीने रेल्वे अधिकाऱ्यांना या समस्येकडे लक्ष देण्याचे आदेश दिले. रेल्वे अधिकाऱ्यांनीही यावर तातडीने कार्यवाही करत कोयना एक्सप्रेसचे डबे क्रमाने उपलब्ध करून दिल्याने कल्याणातील प्रवाशांची होणारी धावपळ आता थांबली आहे. त्यामुळे कोयना एक्सप्रेसच्या कल्याणातील प्रवाशांनी माजी आमदार नरेंद्र पवार यांचे आभार मानले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा