बुरुजाचा भाग ढासळल्यानंतर शिवसेना पदाधिकारी आणि पीडबल्यूडी अधिकाऱ्यांनी केली पाहणी
कल्याण दि.14 जून :
ऐतिहासीक कल्याण नगरीच्या अस्मितेचे प्रतिक असलेल्या दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीचे काम येत्या सोमवारपासून सुरु होणार असल्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती शिवसेनेचे शहरप्रमुख रवी पाटील यांनी प्रसिध्दी माध्यमांना दिली आहे. ऐतिहासीक दुर्गाडी किल्ल्याच्या बुरुजाचा भाग काल रात्रीच्या सुमारास ढासळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांसह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनीही दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन पाहणी केली.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर कामाला गती…
दुर्गाडी किल्ल्याची परिस्थिती अतिशय नाजूक असून त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे राज्यातील सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुर्गाडी किल्ल्याच्या डागडुजीसाठी आम्ही 25 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी आतापर्यंत साडे बारा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यापैकी अडीच कोटी रुपयांचे काम पूर्ण झालेले आहे. तर उर्वरित दहा कोटी रुपयांचे काम लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कचाट्यात अडकल्याने त्याला सुरुवात झाली नसली तरी येत्या 1-2 दिवसांत त्याला सुरुवात होईल अशी माहिती रवी पाटील यांनी यावेळी दिली.
संपूर्ण दुर्गाडी किल्ल्याची दगडी बांधणी…
तसेच संपूर्ण दुर्गाडी किल्ल्याची दगडी बांधणी करण्याची आमची मागणी असून त्यासाठी 50 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. तर मंजूर दहा कोटी रुपयांच्या निधीतून येणाऱ्या घटस्थापनेपूर्वी पूर्ण किल्ल्याची बांधणीचे काम तातडीने आवश्यक असून आम्ही त्यादृष्टीने संबंधित अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करणार आहोत. तर नव्याने होणारे काम हे संपूर्णपणे दगडाचे केले जाणार असून दोन टप्प्यामध्ये ते होणार असल्याचेही सांगत पुरातत्व विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
दोन टप्प्यात अशी होणार किल्ल्याची डागडुजी…
पहिल्या टप्प्यामध्ये दुर्गाडी किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर असणारी कमान आणखी रुंद केली जाणार आहे, बुरुजाची बांधणी केली जाणार आहे, मंदिराच्या भोवताली अष्टकोनी पद्धतीने बांधणी केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात पुरातत्व खात्याच्या माध्यमातून मंदिराच्या मागील बाजूला असणारी भिंत मोठी करून यापुढील सर्व बांधकाम हे दगडी पध्दतीने बांधणी केली जाणार आहे, जेणेकरून किल्ला म्हणून त्याची ओळख प्रस्थापित होईल आणि त्यावर रंगरंगोटी करायची आवश्यकता भासणार नाही असे रवी पाटील यांनी स्पष्ट केले.
यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक जयवंत भोईर, माजी सभागृह नेते श्रेयस समेळ, सुनिल खारुक, नितीन माने यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.