कल्याण दि.21 ऑगस्ट :
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘मेरी माटी मेरा देश ‘ हे अभियान राबवले जात आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून कल्याण पोलिसांच्या परिमंडळ तीनमध्ये ठाणे पोलिसांच्या बँड पथकाकडून विविध शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांचे वादन करण्यात आले. शेकडो शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या अनोख्या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान चेतवण्याचे काम केले.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘यंदा मेरी माटी मेरा देश ‘ या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबविले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ठाणे पोलिसांचे बँड पथक आज कल्याण परिमंडळात आले होते. त्यांनी कल्याण परिमंडळातील वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांसमवेत देशभक्तीपर गीतांचे अतिशय सुंदरपणे वादन केले. कल्याण पश्चिमेच्या लालचौकी येथील शारदा मंदिर शाळेमध्येही हा कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी पोलीस बँड पथकाने सारे जहांसे अच्छा हिंदोस्तां हमारा, जयोस्तुते जयोस्तुते श्रीमहन्मंगले, मेरा कर्मा तू मेरा धर्मा तू, हे राष्ट्र देवतांचे अशी एकाहून एक सरस अवीट गोडीची देशभक्तीपर गाणी आपल्या वाद्यांमधून सादर केली. ज्यावर शालेय विद्यार्थ्यांमध्ये देशाभिमान चेतवण्याचे काम केले. भारत माता की जय आणि वंदे मातरमच्या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला होता.
यावेळी बाजारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार, शारदा मंदिर शाळेचे मुख्याध्यापक आर. डी. पाटील यांच्यासह इतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.