Home ठळक बातम्या कल्याणच्या या चाळीतील ४९ कुटुंबांची दुर्दशा सुरूच; सलग चौथ्या दिवशी घरांमध्ये शिरले...

कल्याणच्या या चाळीतील ४९ कुटुंबांची दुर्दशा सुरूच; सलग चौथ्या दिवशी घरांमध्ये शिरले पाणी

 

बहुधा मोठ्या दुर्घटनेनंतर केडीएमसी प्रशासन होणार जागे?

कल्याण दि. 10 सप्टेंबर :
कल्याणच्या चिकण घर परिसरात असणाऱ्या एका चाळीतील रहिवाशांची दुर्दशा काही केल्या संपायचे नाव घेत नाहीये. मुसळधार पावसामुळे गेल्या सलग चार दिवसांपासून इथल्या रहिवाशांच्या घरामध्ये नाल्याचे पाणी शिरत असून केडीएमसी प्रशासनाकडून कोणतीही उपाय योजना करण्यात येत नसल्याने एखादी दुर्घटना घडल्यानंतर केडीएमसी जागी होणार का? असा संतप्त सवाल विचारला जात आहे.

कल्याण पश्चिमेच्या चिकण घर परिसरात संत तुकाराम नगर परिसरात असणाऱ्या या चाळीमध्ये सुमारे ४९ कुटुंबांचे वास्तव्य आहे. गेल्या ४ दिवसांपासून कल्याण डोंबिवली परिसराला पावसाने झोडपून काढले आहे. परिणामी इथल्या चाळीमध्ये असणाऱ्या घरांमधे शेजारील नाल्याचे पाणी शिरून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत नागरिकांनी वारंवार केडीएमसी प्रशासनाकडे दाद मागूनही कोणतीच कार्यवाही केली जात नसल्याचे रहिवाशांकडून सांगण्यात आले. आज दुपारी झालेल्या पावसानेही या चाळीतील लोकांच्या घरात पुन्हा पाणी शिरल्याचे दिसून आले.

तर गेल्या ४ दिवसांपासून सतत घरांमध्ये पाणी शिरल्याने घरातील वस्तूंचे तर नुकसान झालेच असून त्यासोबत लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र त्यानंतरही केडीएमसीचे प्रशासन कुंभकर्णाप्रमाणे झोपलेले दिसत आहे. बहुधा नेहमीप्रमाणे याठिकाणी एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच हे ढिम्म प्रशासन जागे होणार का हा प्रश्न निर्माण झाला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा