कल्याण दि.5 जानेवारी :
मी माझ्या स्वतःसाठी काय करू शकतो यापेक्षा समाजासाठी, देशासाठी जय करू शकतो हे जो जाणतो तो खऱ्या अर्थाने ब्राह्मणीय समाजात येत असल्याचे सांगत महाराष्ट्रातील समस्त ब्राह्मण समाजाने एकत्र येण्याची गरज समर्थ श्री रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज श्री भूषण महारुद्र स्वामी महाराज यांनी व्यक्त केली. (“The need for the entire Brahmin community in Maharashtra to come together”; Honoring the representatives of the Brahmin community in the state by the Brahmin Sabha)
कल्याणातील ब्राह्मण सभेतर्फे महाराष्ट्राच्या विधीमंडळात निवडून आलेल्या ब्राह्मण समाजाच्या लोकप्रतिनिधींच्या आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात दिमाखदार सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये उपस्थित ब्रह्मवृंदांशी संवाद साधताना महारुद्र स्वामी महाराज यांनी ही गरज व्यक्त केली.
ब्राह्मण समाज इतका ओपन आहे की आम्ही स्वतःला बाजूला ठेवून इतर सर्व समाज घटकांसाठी आज काम करत आहोत, सगळ्यांना सामावून घेत आहोत. स्वतःसोबत इतरांचाही विचार करण्याची ही जी आपली प्रवृत्ती आहे ही आपण अशीच जोपासली पाहीजे असेही महारुद्र स्वामी यावेळी म्हणाले.
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या ब्राह्मण समाजाच्या लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्याची संकल्पना कल्याण ब्राह्मण सभेने मांडली. त्यानुसार राज्यात प्रथमच अशा प्रकारच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कल्याण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सीए मुकुंद बापट यांनी दिली.
…यांचा करण्यात आला सन्मान
त्यानुसार या सन्मान सोहळ्यात ठाण्याचे आमदार संजय केळकर यांचा ॲड. सुरेश पटवर्धन – चंद्रशेखर काणे यांच्या हस्ते, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांचा पंकज दांडेकर अरुण कर्वे यांच्या हस्ते, बोरीवलीचे आमदार संजय उपाध्याय यांचा योगेश मोकाशी,शेखर कुलकर्णी यांच्या हस्ते, राजापूरचे आमदार किरण सामंत यांचा प्रसाद काणे पंकज दांडेकर यांच्या हस्ते तर परशुराम विकास महामंडळ अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांना कुमार घाणेकर आणि प्रसाद काणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच श्री रामदास स्वामी यांचे अकरावे वंशज श्री भूषण महारुद्र स्वामी महाराज, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माधव भांडारी आणि उल्हासनगरचे आमदार कुमार आयलानी यांचाही यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. शाल, वस्त्रगुच्छ, तुळशी वृंदावन, मानपत्र आणि भगवान श्री परशुराम यांची मूर्ती असे या सत्कार सोहळ्याचे स्वरूप होते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी फोनद्वारे या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
ब्राह्मण असल्याचा न्यूनगंड नाही तर अभिमान बाळगा – माधव भांडारी
स्वातंत्र्यपूर्व – स्वातंत्र्योत्तर काळ असो की देशातील सामाजिक, औद्योगिक, सांस्कृतिक असे क्षेत्र. या अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये ब्राह्मण समाजाने देशाच्या जडण घडणीत दिलेले योगदान कोणीही नाकारू शकणार नाही. ते पाहता ब्रह्मवृदांनी आपण ब्राह्मण असल्याचा कोणताही न्यूनगंड न बाळगता अभिमान बाळगावा असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक माधव भांडारी यांनी यावेळी केले. तसेच ब्राह्मण समाजाबाबत काही ठराविक वर्गाकडून अत्यंत खालच्या पातळीवर टिका केली जाते. विशेषतः महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या एकट्या दुकट्या ब्राह्मण कुटुंबाला शहरी भागापेक्षा अधिक जास्त सामाजिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा दुर्बल ब्राह्मण घटकाच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहणे आवश्यक असल्याचेही माधव भांडारी यांनी यावेळी अधोरेखित केले.
या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार, केडीएमसीचे अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कल्याण ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सीए मुकुंद बापट यांच्यासह उपाध्यक्ष पंकज दांडेकर, सचिव प्रसाद काणे शेखर कुलकर्णी, योगेश मोकाशी, आत्माराम घाणेकर, चंद्रशेखर काणे,अरुण कर्वे आणि सर्व स्वयंसेवक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली.