कल्याण-डोंबिवली दि.9 मे :
सध्या कोरोनासोबतच जीवघेण्या म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शनाचा धोका वाढत असून या धोकादायक आजारावर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने राज्यात टास्क फोर्सची गरज असल्याची मागणी खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधताना केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक पार पडली. या बैठकीला कोव्हीड टास्क फोर्समधील डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, आदी तज्ज्ञ मंडळी देखिल उपस्थित होती. राज्यातील कोरोना परिस्थिती आणि वैद्यकीय उपाययोजनांसंदर्भात आयोजित या बैठकीत कोरोना बाधित रूग्णांवरील उपचार तसेच कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासंदर्भात चर्चा करताना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी हे मत मांडले.
ब्लॅक फंगसच्या संसर्गामुळे चेहऱ्याभोवतीच्या हाडांच्या पोकळीमध्ये म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शन वाढत असून याचा परिणाम डोळे, मेंदु यावर होत आहे. कोरोना उपचारादरम्यान वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडस सारख्या औषधांमुळे रुग्णाच्या शरीरात हा संसर्ग वाढत असून याचा सर्वात मोठा धोका अनियंत्रित मधुमेह आणि कोरोनावरील उपचारादरम्यानच्या औषधांच्या साईड इफेक्टस् अर्थात दुष्परिणामांमुळे रोगप्रतिकारक कमी असलेल्या रुग्णांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसचा संसर्ग अतिवेगाने वाढत असून वेळेत उपचार न केल्याने आपले डोळे गमवावे लागल्याच्या अनेक घटना घडत असल्याकडे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी लक्ष वेधले. या संसर्गावर उपचारासाठी ॲफोटेरिसिन बी (Amphotericin b) या इंजेक्शन वापराने इलाज करता येतो. या निदानासाठी असलेले हे औषध खुप खार्चिक आहे. आज ज्याप्रमाणे कोरोनावर उपचारसाठी वापर होत असलेल्या रेमडेसिविर औषधाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे तशीच परिस्थिती येत्या काळामध्ये ॲफोटेरिसिन-बी साठी होऊ शकते, अशी चिंता डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
भविष्यात म्युकरमायकोसिस या फंगल इंफेक्शनाचा धोका वेळीच ओळखून राज्यात त्याबाबत उपाय योजना करण्याचे गरजेचे असल्याचे सांगत डॉ. श्रीकांत शिंदे यांनी रूग्णालयातील ऑक्सिजनची गरज आणि पुरवठा याच्या परिक्षणासाठी कोव्हीड टास्क फोर्स कार्यरत आहे, त्याच धर्तीवर स्टेरॉईडस सारख्या औषधांच्या वापरासंदर्भात देखील टास्क फोर्स स्थापन करावा, असे मत डॉ. शिंदे यांनी मांडले. कोरोना उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेरॉईडस सारख्या औषधांमुळे रुग्णाच्या शरीरात हा संसर्ग वाढत असून यावर आळा घालण्यासाठी टास्क फोर्समधील तज्ञ चिकित्सकांच्या माध्यमातून राज्यातील डॉक्टरांना लाईन ऑफ ट्रिटमेंटसंदर्भात मार्गदर्शन करण्यात येईल, तसेच कोरोनावरील उपचार पद्धतीत स्टेरॉईडस सारख्या औषधांचा वापरांबाबात ट्रिटमेंट प्रोटोकॉल्स आखण्याचे काम देखील हा टास्क फोर्स करेल, असे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी अधोरेखित केले.
कोरोनातून बरे झालेल्या अनेकांना या फंगल इंफेक्शनचा सामना करावा लागत आहे आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर हे खुपच मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. म्युकरमायकोसिस मुळे डोळ्यावर परिणाम होऊन अंधत्व येणे, डोळा गमावावा लागणे तसेच मेंदुपर्यंत संसर्ग वाढल्यास प्रसंगी जीव गमावण्यासारख्या गंभीर घटना घडत असून म्युकरमायकोसिसचा संसर्ग झालेल्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने डोळ्यांशी संबंधित लक्षणे दिसत असून डोळ्यांना सूज येणे, लाल होणे, दृष्टी कमी होणे, सतत डोळ्यांतून पाणी येणे आदी लक्षणे आढळत आहेत. या संसर्गाचे वेळेत निदान व्हावे यासाठी सदर लक्षणे आढळल्यास नागरिकांनी तात्काळ कान, नाक, घसा तज्ञांकडून तपासणी करून घेणे अतिशय महत्वाचे आहे. यासाठी राज्य शासनाने नागरिकांमध्ये म्युकरमायकोसिस संबंधित लक्षणे, चाचण्या आणि तपासणीकरिता जनजागृती करावी, असे देखील डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बैठकीत सुचित केले.