Home ठळक बातम्या कल्याणातील ऐतिहासिक भगवा तलाव हजारो दिव्यांनी निघाला उजळून

कल्याणातील ऐतिहासिक भगवा तलाव हजारो दिव्यांनी निघाला उजळून

कपिल पाटील फाउंडेशन आणि वरुण पाटील यांची संकल्पना

कल्याण दि.23 जानेवारी :
प्रभू श्रीरामांच्या अयोध्येतील भव्य मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात दिवाळी साजरी होत आहे. या प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून भिवंडी लोकसभा मतदारसंघातील कल्याणचा ऐतिहासिक भगवा तलाव आज तब्बल 50 हजार दिव्यांनी उजळून निघाल्याचे दिसून आले. कपिल पाटील फाउंडेशन आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात हजारो रामभक्त सहभागी झाले होते. (The historic bhagwa lake in Kalyan is lit up with thousands of lights)

गेल्या 500 वर्षांपासून करोडो हिंदू बांधवांचे असणारे प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात उतरले. अयोध्येत अतिशय भव्य दिव्य स्वरूपात झालेला प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा आणि मंदिर उद्घाटन सोहळा संपूर्ण जगाने याची देही याची डोळा पाहिला. हा प्राण प्रतिष्ठा सोहळा जसा पूर्ण झाला तसे देशभरात सगळीकडेच एक आनंदोत्सव साजरा केला जात आहे.

कल्याण लोकसभेचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या आणि भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील यांच्या संकल्पनेतून कल्याणच्या भगवा तलाव परिसरात न भूतो न भविष्यती असा सोहळा कल्याणकरांनी आज अनुभवला. भगवा तलावाच्या प्रत्येक काना कोपऱ्यात रामभक्तांनी तब्बल 50 हजार दिवे प्रज्वलित करून हा परिसर दिपमयी करून टाकला. त्यानंतर प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि बजरंग बली यांची अत्यंत देखणी अशी भव्य शोभायात्रा, मग अयोध्येतील शरयू नदी किनारी होणाऱ्या आरतीच्या धर्तीवर केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झालेली महाआरती, त्यापाठोपाठ नयनरम्य फटाक्यांची जंगी आतिषबाजी आणि मग अयोध्येत कारसेवा बजावलेल्या कल्याणातील कार सेवकांचा सत्कार समारंभ असे अनेक भरगच्च कार्यक्रम यावेळी आयोजित करण्यात आले होते.

तर भगवा तलाव परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या गॅलरीमध्ये प्रभू श्रीरामांची एक सुदंर अशी मूर्तीही लोकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आली होती. जिच्या दर्शनासाठी राम भक्तांनी अलोट गर्दी केली होती.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, जिल्हाध्यक्ष नरेंद्र सुर्यवंशी, माजी आमदार नरेंद्र पवार, भाजप शहराध्यक्ष वरुण पाटील, प्रेमनाथ म्हात्रे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा