
महावितरणच्या कारभारविरोधात तीव्र संताप
कल्याण दि.30 मार्च :
आज गुढीपाडवा.हिंदू नववर्षाचा पहिला दिवस. आजचा हा दिवस आपल्याकडे अतिशय उत्साहात, नविन कपडे – सोने खरेदी करून आणि गोडधोडाच्या जेवणाद्वारे साजरा केला जातो. मात्र कल्याण पश्चिमेतील सुमारे 150 -200 व्यापाऱ्यांचा आजचा गुढीपाडव्याचा सण अतिशय कटु आठवणींमध्ये साजरा झाला. तांत्रिक बिघाडामुळे सकाळी 9.30 वाजल्यापासून खंडीत झालेला वीज पुरवठा तब्बल 8 तास उलटूनही आलाच नसल्याने या व्यावसायिकांना मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागले. (The heat is already unbearable and the electricity has been out for 8 hours; Gudi Padwa of shopkeepers in Kalyan West has not been sweet at all)
गुढीपाडव्याचा सण म्हटला की आपल्याकडे स्वागतयात्रा, घरोघरी गुढी उभारणे नविन कपडे, वस्तू, सोने खरेदी करणे अशा विविध पद्धतीने साजरा केला जातो. त्यामुळेच तर शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक, लक्ष्मी मार्केट, मोहम्मद अली चौकातील प्रत्येक दुकान हे ग्राहकांच्या गर्दीने फुलून गेलेले असते. कारण व्यापाऱ्यांच्या दृष्टीने दिवाळीनंतर येणारा हा पहिलाच मोठा सण असल्याने यादिवशी ग्राहकांकडून चांगली खरेदी केली जात असल्याने बाजारातही मोठी आर्थिक उलाढाल होते.
परंतू यंदाचा गुढीपाडवा मात्र या आर्थिक उलाढालीला चांगलाच अपवाद ठरला. आणि त्याला कारण ठरले ते तब्बल 8 तास खंडीत झालेला या परिसराचा वीज पुरवठा. आज सकाळी दुकान उघडल्यापासून म्हणजेच साधारणपणे साडे नऊ वाजल्यापासून जो वीज पुरवठा खंडीत झाला आहे, तो आता 8 तास उलटूनही अद्याप सुरू झालेला नाहीये. त्यातच बाहेर असह्य अशी गर्मी आणि दुकानात वीज नाही. परिणामी दुकानात आलेल्या ग्राहकांनी अवघ्या काही मिनिटातच दुकानातून काढता पाय घेतल्याची माहिती कपडे व्यापारी विनायक ठाकरे यांनी दिली.
तर गुढीपाडवा म्हटलं की यादिवशी लोकं श्रीखंड, आम्रखंड खरेदी करण्यासाठी मिठाईच्या दुकानात मोठी गर्दी करतात. परंतू काल सायंकाळीही वीज नव्हती, आज तर सकाळी 9.30 वाजल्यापासूनच वीजपुरवठा खंडीत झालाय. परिणामी आमच्या दुकानातील श्रीखंड, आम्रखंडासह अनेक मिठाईचे पदार्थ खराब झाले. ज्यामुळे आमचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्रतिक्रिया एका मिठाई दुकानदाराने दिली.
तर महावितरणचे कर्मचारी मार्च एंडिंग असल्याचे सांगत अँडव्हान्समध्ये लाईट बिले भरण्याचे सांगत गेल्या काही दिवसांपासून फिरत होते. परंतु आज आम्हाला त्यांच्याकडून सहकार्याची खरी गरज होती. मात्र तब्बल 8 तास उलटूनही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही. महावितरणने गांभीर्याने आमच्या समस्येकडे लक्ष द्यावे अन्यथा व्यापाऱ्यांचा उद्रेक अटळ असल्याची संतप्त प्रतिक्रिया व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हरिष खंडेलवाल यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान यासंदर्भात महावितरणशी संपर्क साधला असता या भागात असलेल्या रस्त्याखालील मुख्य वहिनीमध्ये मोठा तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले. सिमेंट रस्त्याखालून गेलेल्या या वीज वाहिनीच्या दुरुस्तीचे काम महावितरणकडून तातडीने हाती घेण्यात आलं असून लवकरच हा वीज पुरवठा सुरळीत केला जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.