सोसायटीच्या जलवाहिनीतून येतेय दूषित पाणी
कल्याण दि.15 जानेवारी :
सोसायटीेतील घरांमध्ये होणाऱ्या दूषित पाण्यामुळे कल्याणात 65 कुटुंबांचे आरोग्य धोक्यात आले असून याबाबत केडीएमसी प्रशासनाकडे तक्रार करूनही कोणतीच दखल घेतली जात नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. विशेष म्हणजे केडीएमसी मुख्यालयापासून अगदी जवळच्या अंतरावर ही सोसायटी आहे.
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पाठारे नर्सरीकडे जाणाऱ्या भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर मार्गावर सनराईज गॅलेक्सी बी नावाची ही सोसायटी आहे. या मार्गावर सध्या केडीएमसी प्रशासनाकडून काँक्रिटीकरणाचे काम केले जात आहे. गेल्या आठवड्याभरपूर्वी अचानक आमच्या घरांमध्ये दूषित आणि गढूळ पाणी यायला सुरुवात झाल्याची माहिती इथल्या स्थानिक रहिवाशांनी दिली. या पाण्याला प्रचंड घाण वासही येत असून यासंदर्भात सोसायटीद्वारे त्वरीत केडीएमसी प्रशासनाकडे पत्रव्यवहारही केल्याचे रहिवाशांनी सांगितले.
मात्र त्यानंतर केडीएमसी कर्मचाऱ्यांनी येऊन केवळ पाहणी केली आणि काहीही झाले नसून तुमची जलवाहिनी सुस्थितीत आहे असे सांगितल्याची माहिती या रहिवाशांनी दिली आहे. परंतु आजही आमच्या घरी तसेच दूषित, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाणी येत असून आता घरातील सदस्य आजारी पडू लागले आहेत, पिण्यासाठी रोज बाटलीबंद पाणी वापरणे आणि इतर कामासाठी पाण्याचा टँकर मागवणे आम्हाला अजिबात परवडत नाहीये. त्यामुळे केडीएमसी प्रशासन आमच्या मरणाची वाट पाहत आहे का? की आम्ही मेल्यानंतरच आमच्या तक्रारीची दखल घेतली जाईल असे संतप्त सवाल या रहिवाशांनी प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना केले आहेत.
इतकेच नाही तर या सोसायटीतील रहिवाशांनी घरात येणाऱ्या दूषित पाण्याचे नमुनेही बाटलीमध्ये भरून केडीएमसी पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत. परंतु त्यानंतरही कोणतीच कार्यवाही केली जात नाहीये. जवळपास 60-70 कुटुंबाच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊनही केडीएमसी प्रशासनाला त्याची दखल घ्यावीशी वाटत नाही, यापेक्षा अधिक दुर्दैव ते काय असणार? त्यामुळेच हे रहिवासी आता केडीएमसी प्रशासनाविरोधात आक्रमक पवित्रा घेण्याच्या तयारीत दिसत आहेत.