पारंपरिक वेशात हजारो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
कल्याण डोंबिवली दि.२२ मार्च :
एकीकडे ढोल ताशा आणि लेझीम पथकांचा गगनाला भिडणारा नाद तर दुसरीकडे पारंपरिक वेशभूषेमध्ये त्याच गगनस्पर्शी उत्साहात तल्लीन झालेले कल्याण डोंबिवलीकर. कमालीचा उत्साह, कमालीचा जल्लोष आणि त्यासोबतच राखले गेलेले सामाजिक भान. कल्याण डोंबिवलीमध्ये निघालेल्या शोभायात्रांचे काहीसे असेच वर्णन करावे लागेल.
कोरोनामुळे गेली दोन वर्षे नागरिकांना आपापल्या घरातच सर्व सण उत्सव साजरे करावे लागले. मात्र आता ही कोवीडची परिस्थिती बऱ्यापैकी निवळल्याने सर्वच निर्बंध मर्यादा काढून टाकण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नववर्ष शोभायात्रांचे उगमस्थान असणाऱ्या सांस्कृतिक नगरी डोंबिवलीसह कल्याण शहरात तर एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले होते.
डोंबिवलीच्या शोभायात्रेची वसुधैव कुटुंबकम् संकल्पनेवर आखणी…
श्री गणेश मंदिर संस्थानतर्फे आयोजित डोंबिवलीच्या स्वागत यात्रेचे यंदा २५ वे वर्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राबविण्यात येणाऱ्या वसुधैव कुटुंबकम् संकल्पनेची जगभरात चर्चा सुरू आहे. या व्यापक संकल्पनेचे प्रतिबिंब यंदा डोंबिवलीच्या स्वागतयात्रेतही दिसून आले. या संकल्पनेनुसार त्याविषयावरील विविध देखव्यांचे चित्ररथ, पंच महाभूतांची दिंडी आदी चित्ररथांचा समावेश होता. त्याशिवाय गेले आठवडाभर श्रीराम नाम जप यज्ञ, सामुदायिक गीता – गणपती अथर्वशीर्ष पठण, दिपोत्सव, बहुभाषिक भजन, पाककला स्पर्धा, सांस्कृतिक पथ, स्कूटर रॅली, गीत रामायण, महारांगोळी, प्रभुरामांच्या जीवनावर आधारित नृत्यविष्कारासह छ्त्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त व्याख्यान असे भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम यंदा आयोजित करण्यात आले होते.
तर कल्याणच्या स्वागतयात्रेत ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या संकल्पनेसह सामाजिक देखावे…
डोंबिवलीप्रमाणेच कल्याणात निघालेल्या नववर्ष स्वागत यात्रेमध्ये देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षाची संकल्पना राबवण्यात आल्याचे दिसून आले. कल्याण संस्कृती मंचातर्फे आयोजित या स्वागत यात्रेमध्ये कल्याणकर नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतल्याचे दिसून आले. कल्याणच्या या स्वागत यात्रेत अमृत महोत्सवी संकल्पनेच्या माध्यमातून देशाच्या ७५ वर्षांतील चमकदार कामगिरी मांडण्यात आली. तर त्याचसोबत अनेक सामाजिक विषयांवर जनजागृती करणारे देखावेही या शोभा यात्रेचे वैशिष्ट्य ठरले.
कल्याण पश्चिमेतील सिंडीगेट येथे गणेश पूजन आणि गुढी उभारुन या स्वागत यात्रेला प्रारंभ झाला. त्यानंतर आयुक्त बंगला, महावितरण कार्यालय, संतोषी माता रोड, सहजानंद चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शंकरराव चौक, माता अहिल्याबाई होळकर चौक, लोकमान्य टिळक चौक, पारनाका, लालचौकी मार्गे नमस्कार मंडळात या शोभा यात्रेची सांगता झाली.