गो.नी. दांडेकर यांच्या जीवनावर आधारित माहितीपटाचे प्रदर्शन
कल्याण दि. २ एप्रिल :
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले स्वराज्याचे किल्ले म्हणजे केवळ तुटलेले बुरुज नाहीयेत तर ती ऊर्जेची केंद्र, शक्तीपीठं असल्याचे मत कल्याण डोंबिवली महानरपालिकेचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी व्यक्त केले. सुप्रसिद्ध लेखक आणि दुर्गमहर्षी गो.नी. दांडेकर यांच्या जीवनावर आधारित ‘ किल्ले पाहिलेला माणूस ‘ या माहितीपटाच्या पहिल्या प्रदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. केडीएमसी, अश्वमेध प्रतिष्ठान आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघातर्फे कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित अत्यंत सुंदर अशा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला दैनिक लोकसत्ताचे कार्यकारी संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार विनायक परब, सुप्रसिद्ध सगुणा बाग उपक्रमाचे संचालक चंद्रशेखर भडसावळे, राजन देशमुख, गिर्यारोहण महासंघाचे मेश्राम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वराज्याच्या गड किल्ल्यांवर इतकं प्रेम करणाऱ्या गो.नी. दांडेकर यांनी किल्ल्यांबाबत आपल्याला एक वेगळी दृष्टी दिली आहे. या गड किल्यांसाठी असंख्य मावळ्यांनी आपले रक्त सांडले आहेत, हे किल्ले म्हणजे केवळ तुटलेले बुरुज नसून दुर्गप्रेमींसाठी ऊर्जा देणारी स्थळं आहेत. त्यांचे संवर्धन करणे ही आपल्या सर्वांची जबादारी असून यासाठी कुठेही आणि कोणतेही सहकार्य करण्यास आपण सदैव तत्पर असल्याचेही डॉ. सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
तर गो.नी. दांडेकर हे खूप मोठे व्यक्तीमत्व असून एक दोन शब्दांत त्यांना व्यक्त करणं अशक्य आहे. त्यांच्या जीवनावर आधारित हा जीवनपट गो.नी. दांडेकर यांना नव्या पिढीपर्यंत पोचविण्याचे काम करेल अशा शब्दांमध्ये ज्येष्ठ पत्रकार विनायक परब यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ज्या काळात कोणाला माहितीही नसणाऱ्या बायोडायव्हार्सिटीचे त्यांनी आपल्या काळात वर्णन करून ठेवले आहे. ते आपण समजून घेतले तर आपले आयुष्य अधिक चांगले समृद्ध होईल असेही परब यांनी यावेळी सांगितले.
तर मातीची धूप, पडझड होत असून आपल्या भविष्याच्या दृष्टीने ते वाचवणे महत्वाचे आहे. आपला पुरातन काळातील सुवर्ण ठेवा चांगला जगवायचा असेल तर सूक्ष्मजिवाणू संपदा जतन करण्यासाठी एक वेगळा दृष्टीकोन घेऊन गड किल्ल्याकडे जावे लागेल असे आवाहन सगुणा बाग उपक्रमाचे संचालक चंद्रशेखर भडसावळे यांनी केले.
यावेळी दुर्ग महर्षी गो.नी.दांडेकर यांच्या जीवनावर आधारित ‘ किल्ले पाहिलेला माणूस ‘ या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले. ज्यामध्ये गो.नी.दांडेकर यांचे दुर्गप्रेम आणि हे किल्ले जतन करण्यासाठी त्यांची तळमळ यावर सखोल प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. मृणाल कुलकर्णी आणि सुबोध भावे यांसारख्या दिग्गज कलाकरांच्या आवाजात हा माहितीपट शब्दबद्ध करण्यात आला आहे. महाराष्ट्रात एकाहून अनेक ठिकाणी एकाच वेळी त्याचे प्रदर्शन करण्यात आले. कल्याणात झालेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अश्वमेध प्रतिष्ठानचे अविनाश हरड यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने विशेष मेहनत घेतली.