कल्याण दि.28 मार्च :
कल्याण आणि टिटवाळ्याला जोडणाऱ्या वडवली आणि वालधुनी नदीवरील उड्डाणपूलांचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमूख उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या दोन्ही पुलांमुळे वाहन चालक आणि नागरिकांची होणारी गैरसोय टळण्यास मोठी मदत होणार आहे.
कल्याण – टिटवाळा मार्गावर वडवली आणि आंबिवलीला जोडणारा रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाचे गेल्या 12 वर्षांपासून काम सुरू होते. काही तांत्रिक अडचणी आणि भूसंपादनाच्या समस्येमुळे हा महत्वपूर्ण उड्डाणपूल कित्येक वर्षे अर्धवट अवस्थेत उभा होता.मात्र प्रदीर्घ कालावधीनंतर आता नागरिकांना तास न तास वाहतूक कोंडी आणि रेल्वे फाटक उघडण्याची वाट पाहावी लागणार नाही.
तर कल्याण-मुरबाड मार्गावर भवानी चौक परिसरात वालधुनी नदीवर असणारा उड्डाणपूल जुना झाल्याने वाढलेल्या वाहतुकीसाठी पुरेसा नव्हता. त्यामुळे त्याच्याच बाजूला नविन रुंद पूल बांधण्यात आला. त्याचेही काल मान्यवरांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. या दोन्ही उड्डाणपुलांमुळे या मार्गावरील प्रवास नक्कीच सुखकर होण्यास मदत होईल.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , खासदार कपिल पाटील, आमदार विश्वनाथ भोईर, आमदार रविंद्र चव्हाण, महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी- देवनपल्ली आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान या उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकारी -कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक केले जात असताना दुसरीकडे राजकीय पदाधिकाऱ्यांना हे नियम लागू नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत आहे.