
केडीएमसी आणि किन्नर अस्मिता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
कल्याण दि.11 मार्च :
समाजाचाच एक भाग असूनही समाजात आणि मुख्य प्रवाहात दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे तृतीयपंथी. आमच्या आई – वडिलांनी, कुटुंबियांनी आम्हाला मनापासून स्विकारले तर आम्हाला कोणासमोर हात पसरण्याची वेळ येणार नाही अशा शब्दांत तृतीयपंथीयांच्या मान्यवर प्रतिनिधींनी आपल्या वेदना कल्याणात व्यक्त केल्या. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा समाज कल्याण विभाग आणि किन्नर अस्मिता संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील पहिला किन्नर महोत्सव आचार्य अत्रे रंगमंदिरात संपन्न झाला. त्यामध्ये उपस्थित असलेल्या तृतीय पंथीयांच्या विविध मान्यवर प्रतिनिधींनी आपल्या वेदना आणि कुटुंब तसेच समाजाकडून असणाऱ्या अपेक्षा अधोरेखित केल्या. (The first transgender festival in the state: “Along with the family, the society also need to accept us wholeheartedly”)
इतर महिला आणि पुरुषांप्रमाणे आम्हीही या भारताचे नागरिक असून आम्हालाही इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. आम्हालाही या समाजामध्ये सन्मानाची वागणूक मिळावी अशी आमची इच्छा आहे. आम्हालाही शिकायचे आहे, पुढे जायचे आहे. परंतु त्याऐवजी आमच्या वाट्याला केवळ भेदभावच येत असतो. मुळातच आमच्या आई वडिलांनी कुटुंबियांनी आम्हाला मनापासून स्विकारले- सांभाळले, चांगले शिक्षण दिले तर कोणत्याची समस्येला आम्हाला तोंड द्यावे लागणार नाही की भीक मागण्यासाठी रस्त्यावर यावे लागणार नाही अशा शब्दांत ॲड. सान्वी जेठवानी यांनी तृतीयपंथीयांच्या वेदना व्यक्त केल्या.
तर वेदकालापासून आणि वेदांमध्येही तृतीय पंथीयांना उपदेवता म्हणून गौरवण्यात आलं आहे. परंतु आज त्याच्याबरोबर उलट परिस्थिती निर्माण झाली असून आपलं मूळ अस्तित्व आणि ती ओळख आपण सर्वांनी जाणून घेण्याची गरज डॉ. शिवलक्ष्मी नंदगिरी यांनी यावेळी व्यक्त केली.
तर आपण आणि गौरी सावंतने सर्वोच्च न्यायालयात गेलो आणि तिकडचा निकाल आल्यानंतर भरपूर काम झाले आहे. मल्टी नॅशनल कंपन्यांनी आपले दरवाजे आता आमच्यासाठी उघडण्यास सुरुवात केली आहे. परंतू अद्याप भरपूर काम होणे बाकी असून महाराष्ट्रात ट्रान्सजेंडर कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्याची मागणी किन्नर आखाड्याच्या आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी यावेळी केली.
तर भारतामध्ये गेल्या 3 दशकांपासून आम्ही आमच्या हक्क आणि अधिकारांसाठी लढत असून आताशी अर्धीच लढाई जिंकली असून उर्वरित लढाई जिंकण्यासाठी आता नविन पिढी सज्ज झाली असल्याचे मत हमसफर ट्रस्टचे विवेक राज आनंद यांनी व्यक्त केले.
आमच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये असलेले भेदभाव आणि गैरसमज दूर झाले पाहिजेत. आम्हीही तुमच्यासारखेच एक माणूस आहोत, आमच्याशी कधी तरी बोलून बघा, आमच्या भावना जाणून बघा अशा शब्दांत डॉ. सलमा खान यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
किन्नरांप्रती लोकांचा दृष्टीकोन वेगळा आहे. त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्याची गरज असून, किन्नर पंथीयांना आपल्या पायावर उभे राहण्यासाठी मदत करण्याचे आवाहन किन्नर अस्मितेच्या फाऊंडर गुरु निता केणे यांनी यावेळी केले.
आपण आज 2025 मध्ये असूनही आजही आपल्याला महिला दिन साजरा करावा लागतो आहे याची खंत व्यक्त करत समानता हा समाजातील सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे मत केडीएमसी आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी यावेळी व्यक्त केले. समाजातील प्रत्येक घटकाला समान मानवी हक्क मिळाला पाहिजे. हा कार्यक्रम आयोजित करण्यामागे कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाचाही हाच उद्देश असून आपल्यातील शक्तीची जाणीव जागृत करण्याची आवश्यकता आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनी यावेळी व्यक्त केली.
तर हा कार्यक्रम म्हणजे केवळ एक सुरुवात असून प्रशासन आणि तृतीय पंथीयांच्या संघटना आपण सर्वांनी हातात हात घालून पुढचे उद्दिष्ट गाठायचे असा विश्वास या संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना राबवणाऱ्या उपआयुक्त संजय जाधव यांनी यावेळी व्यक्त केला.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव, समाज कल्याण अधिकारी प्रशांत गव्हाणकर यांच्यासह संपूर्ण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दोन महिन्यांपासून विशेष मेहनत घेतली.
दरम्यान या महोत्सवातील आकर्षणाचा मुख्य केंद्रबिंदू ठरला तो सांस्कृतिक सोहळा. तृतीयपंथीय कलाकारांनी अत्यंत सुंदरपणे सादर केलेल्या नृत्यकलेला उपस्थितांनी अक्षरश: डोक्यावर घेतल्याचे दिसून आले. विशेषता गणेश वंदना, लावणी आणि राधा कृष्ण नृत्याने तर या कार्यक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. तर तृतीय पंथी कलाकारांनी सादर केलेल्या फॅशन शोने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडण्यासह समाजाच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालण्याचेही काम केले.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र रेडिओलॉजिस्ट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रशांत पाटील, अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे, सचिव किशोर शेळके, समाज कल्याण अधिकारी प्रशांत गव्हाणकर, किन्नर अस्मिता संस्थेच्या नीता केणे, झेनप पटेल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.