सर्जा राजाच्या आणि गोमातेच्या आरोग्यासाठी कित्येक वर्षांपासूनची अनोखी प्रथा
कल्याण दि.२६ ऑक्टोबर :
कधीकाळी टुमदार खेडेगाव असणाऱ्या कल्याणला आज कॉस्मोपॉलिटन शहराचा चेहरा प्राप्त झाला आहे. मात्र तरीही कित्येक पिढ्यांपासून साजरा होणारा दिवाळीतील बलिप्रतिपदेचा सण आजही आगरी कोळी बांधवांनी त्याच उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला पाहायला मिळाले. कल्याण शहराच्या विविध भागात तसेच आसपासच्या परिसरात अतिशय थाटामाटात तो साजरा करण्यात आला.
कल्याण पूर्वी एक टुमदार खेडेगाव म्हणून प्रसिद्ध…
कल्याण शहरामध्ये गेल्या काही वर्षांत सिमेंटच्या जंगलाचा आणि उत्तुंग इमारतींचा झगमगाट दिसत असला तरी पूर्वी मात्र हा परिसर एक टुमदार खेडेगाव म्हणून प्रसिद्ध होते. याठिकाणी पुर्वीपासूनच आगरी आणि कोळी या स्थानिक भूमिपुत्रांची मोठी वस्ती. त्यामुळे साहजिकच याठिकाणी पूर्वी प्रत्येकाकडे मोठ्या प्रमाणात आपापली शेतजमीन होती. त्यामध्ये सर्जा राजाच्या सहाय्याने हा भूमिपुत्र सोनं पिकवायचा आणि इतरांचे उदरभरण करायचा.
सर्जा राजा आणि गोमातेला चांगले आरोग्य लाभण्यासाठी बलीप्रतिपदेचा सण साजरा करण्याची प्रथा…
शेतात त्याच्यासोबतीने घाम गाळणाऱ्या या गुरा ढोरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी हा सण आमच्या कित्येक पिढ्यांपासून पारंपरिक पद्धतीने साजरा होत असल्याची माहिती कल्याणच्या आधारवाडी गावातील भूमीपुत्रांनी दिली. आमच्या लहानपणी आमच्या आजोबांकडून जसा हा सण साजरा व्हायचा तसाच आताही आम्ही करत असल्याचेही त्यांनी सांगितले. वाळलेले गवताची (पेंढा) आडवी रांग काढून ते पेटवले जाते आणि त्यावरून हे सर्जा – राजा आणि गोमाता उडी मारून नेल्या जातात. येणाऱ्या थंडीच्या ऋतूत त्यांचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांनी शेतामध्ये चांगले काम करावे या उद्देशाने हा सण साजरा करण्याची आगरी आणि कोळी बांधवांमध्ये ही प्रथा आहे.
पूर्वीच्या काळी कल्याण शहर आणि आसपास मोठ्या प्रमाणावर होणारी शेती आता कमी झाली असली तरी स्थानिक भूमिपुत्रांकडून पिढ्या न पिढ्या सुरू असणारी हा सण साजरा करण्याची प्रथा नव्या पिढीकडूनही तितक्याच उत्साहात सुरू आहे हे विशेष.