Home Uncategorised अखेर कल्याणमध्येही बर्ड फ्ल्यूची एन्ट्री ; अटाळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल...

अखेर कल्याणमध्येही बर्ड फ्ल्यूची एन्ट्री ; अटाळी आणि रायत्यातील मृत कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह

 

कल्याण दि.19 जानेवारी :
कल्याणमध्येही ‘बर्ड फ्ल्यू’ची (bird flu) एन्ट्री झाली असून कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी आणि कल्याण तालुक्यातील रायत्यामध्ये मृत पावलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे. त्यामूळे इकडची पशुसंवर्धनसह संपूर्ण आरोग्य यंत्रणा आणखीन सतर्क झाली असून पुढील खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत.
गेल्या आठवड्याभरात कल्याण डोंबिवली परिसरात विविध ठिकाणी कावळे, कबुतरं, कोंबड्या, 2 बगळे आदी 7 – 8 पक्षी मृतावस्थेत आढळून आले होते. या सर्व मृत पक्ष्यांचे नमूने पशुसंवर्धन विभागातर्फे पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेला पाठवण्यात आले होते. त्यातील 2 पक्ष्यांचे नमुने बर्ड फ्ल्यू पॉझिटिव्ह आढळून आल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. नरेश बांगर यांनी दिली.

कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील अटाळी गावांतील एका घरात काही पाळीव कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. तर रायते गावात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममध्येही असाच प्रकार घडला आहे. यानंतर या दोन्ही ठिकाणांच्या मृत कोंबड्यांचे नमुने पुण्यातील पशुवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्यांचे अहवाल नुकतेच पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाले असून पशुसंवर्धन विभागानेही तातडीने पुढील कार्यवाही सुरू केली आहे.
रायता आणि अटाळी या दोन्ही ठिकाणी 1 किलोमीटर परिघात असणाऱ्या पोल्ट्री फार्ममधील किंवा घरगुती पाळीव अशा सर्व शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार शास्त्रोक्त पद्धतीने कोंबड्यांना मारून निर्मनुष्य जागी पुरणार असल्याचेही डॉ. बांगर यांनी सांगितले. तर या दोन्ही ठिकाणच्या 1 किलोमीटर परिक्षेत्रात कोंबड्या पाळण्यावर आणि विक्रीवर बंदी असणार आहे.
पशुसंवर्धन विभागाने एकीकडे योग्य तापमानावर शिजवून चिकन खाण्यास कोणताही धोका नसल्याचे सांगितले असले तरी एक आठवड्यापूर्वीच इकडे चिकनचे दर आणि त्यांची मोठ्या प्रमाणात कोसळली आहे. अशातच आता बर्ड फ्ल्यूचा कल्याणात शिरकाव झाल्याच्या पार्श्वभूमीवर यामध्ये आणखीनच वाढ होण्याची भिती व्यक्त होत आहे. दरम्यान पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी याबाबत कल्याणचे तहसीलदार दिपक आकडे यांची तसेच केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा