Home ठळक बातम्या विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव न दिल्यास मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही...

विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव न दिल्यास मुख्यमंत्र्यांना घराबाहेर पडू देणार नाही – पनवेल उपमहापौर जगदीश गायकवाड

 

डोंबिवली दि.18 जुलै :
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर दिल्लीत अर्धनग्न आंदोलन छेडण्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर आक्रोश आंदोलन छेडणार असल्याचा इशारा पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी दिला. दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवलीच्या प्रगती महाविद्यालय सभागृहात विमानतळ नामकरण परीषदेचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत होते.

नवी मुंबईत होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आगरी समाज आक्रमक झाला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन आणि कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून दि.बा.पाटील नामकरण समर्थन समितीतर्फे डोंबिवलीत ही परीषद भरवण्यात आली होती. अनेक दिवस नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी आगरी समाजाकडून केली जात असून या मागणीला इतर समाजाने आणि अनेक राजकीय पक्षांनीही पाठींबा दिला आहे. मात्र तरीही या विमानतळाला स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचे जगदीश गायकवाड म्हणाले. त्यामुळेच आपल्या मागणीसाठी येत्या 29 जुलैपूर्वी  पारंपरिक वेशात दिल्लीला जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत हवाई वाहतूक मंत्र्यांची भेट आपण भेट घेणार आहोत. त्यानंतरही हा प्रश्न मार्गी न लागल्यास दिल्लीत अर्धनग्न आंदोलन छेडणार आणि त्यानंतरही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला निर्णय बदलला नाही तर मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घराला घेराव घालत त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा इशारा जगदीश गायकवाड यांनी या परिषदेत बोलताना दिला आहे.

या परिषदेला भाजप नेते जगन्नाथ पाटील, लालबावटा रिक्षा युनियन अध्यक्ष कॉम्रेड काळू कोमास्कर, समिती अध्यक्ष दशरथ पाटील, राष्ट्रवादीचे नेते अर्जुन बुवा चौधरी, कॉम्रेड कृष्णा भोयर, कॉग्रेस प्रदेश सचिव संतोष केणे आदी मान्यवर उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा