कल्याण-डोंबिवली दि.4 ऑक्टोबर :
कोरोनामुळे राज्यभरात तब्बल दीड वर्ष बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू झाल्यात. कल्याण डोंबिवलीमध्येही शाळांचे 8 वी ते 10 वीचे वर्ग आजपासून सुरू करण्यात आले. दिड वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर शाळा सुरू होत असल्याने अनेक शाळांमध्ये प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
विशेषतः कल्याण पश्चिमेतील शारदा मंदिर आणि कल्याण कल्याण पूर्वेतील सम्राट अशोक विद्यालयात तर विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. शाळा सुरू होणार म्हणून गेल्या काही दिवसांपासून मुलांच्या स्वागतासाठी शाळांनी कंबर कसली होती. दिड वर्षानंतर शाळेत येणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी आरती, ढोल-ताशा, फुलांचा वर्षाव, रांगोळ्याच्या पायघड्या अशी जोरदार तयारी करण्यात आली होती. शाळेकडून मुलांना ओवाळून, पुष्प वृष्टी करून शाळेत प्रवेश देण्यात आल्याचे सम्राट अशोक विद्यालयाच्या गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
तर पूर्वतयारी म्हणून शाळेचा सर्व परिसर व सर्व वर्ग कर्मचाऱ्यांनी स्वच्छता आणि निर्जंतुकिकरण एक दिवस आधीच करून घेण्यात आले.।विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शाळेचे प्रवेशद्वार रंगीबेरंगी फुगे लावून सजविण्यात आले होते. शाळेच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांचे तापमान आणि ऑक्सिजन स्तर तपासणी करून गुलाब पुष्प देत आतमध्ये प्रवेश देण्यात आल्याची माहिती शारदा मंदिर शाळेच्या आर.डी.पाटील सरांनी दिली. डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी विभागातील मातोश्री सरलाबाई म्हात्रे विद्यालयातील विद्यार्थ्यांचे, शिक्षक वर्ग आणि कर्मचाऱ्यांनी मनःपूर्वक स्वागत केलेले पाहायला मिळाले.
दरम्यान शाळा सुरू झाल्याचा आनंद शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरही झळकत होता.