खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी घेतली केडीएमसी आयुक्तांसोबत बैठक
कल्याण दि.8 मार्च :
कल्याण शिळ मार्गावर असलेल्या लोढा हेवन गृहप्रकल्पाच्या शांती उपवन इमारत संकुलातील एका इमारतीला तडे गेल्याने अनेक कुटुंब रस्त्यावर आली आहे. मात्र याठिकाणी नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत बाधित कुटुंबांना विकासकांकडूनच घरभाडे दिले जाईल अशी माहिती कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. (Shanti Upvan Building: The builder will bear all the expenses of the residents till the new building)
केडीएमसी मुख्यालयात झाली बैठक…
शांती उपवन इमारतीमधील या कुटुंबांच्या निवास आणि हक्काच्या घराचा प्रश्न लवकर मार्गी लागण्या संदर्भात आज खा. डॉ. शिंदे यांनी कल्याण डोंबिवली महापालिकेत आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, लोढा विकासक प्रतिनिधींसह शांती उपवनमधील नागरिकांसह बैठक घेतली.
रहिवाशांनी घेतली दोन दिवसांपूर्वी भेट…
चार दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास अचानक या इमारतीला तडे गेले असून इमारतीचा काही भागही खचलाय. यामुळे त्या इमारतींमधील तसेच त्याला लागूनच असलेल्या पाच इमारतींमधील कुटुंबीयांना सुरक्षेच्या दृष्टीने इतर स्थळी हलविण्यात आले आहे. मात्र येथील विस्थापितांचा प्रश्न हा तात्पुरत्या स्थलांतराने सुटणारा नाही. याच पार्श्वभूमीवर येथील रहिवाशांनी आपली दोन दिवसांपूर्वी भेट घेतल्याचे खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले.
इमारतींचे संपूर्ण काम होईपर्यंत बाधित कुटुंबांना विकासकांकडून घरभाडे…
दरम्यान या धोकादायक इमारतींचे लवकरात लवकर पाडकाम करून त्या ठिकाणी नव्याने इमारती उभारून तेथील नागरिकांना त्यांचे हक्काचे घर पुन्हा देण्यात यावे, अशी सूचना यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपस्थित विकासकांना दिल्या. तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींचे संपूर्ण काम पूर्ण होईपर्यंत तेथील बाधित कुटुंबांना घरभाडेही विकासकांकडून अदा करण्यात येईल असेही या बैठकीत त्यांनी स्पष्ट केले.
इमारत पाडण्यापूर्वी घरातील साहित्य सुस्थितीत देण्याच्या सूचना…
तर अचानक इमारत सोडावी लागल्याने तेथील कुटुंबीयांना त्यांचे घरातील साहित्य आहे त्या स्थितीतच सोडून जावे लागले होते. हे सर्व साहित्य कुटुंबीयांची आयुष्यभराची जमापुंजी असून हे सर्व साहित्य इमारत पाडण्यापूर्वी सुस्थितीत देण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या.
व्यवसायासाठी तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देणार…
तर या गृहसंकुलातील इमारतींमध्ये असणाऱ्या गाळेधारकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांना लवकरच इमारतीच्या परिसरात तात्पुरत्या स्वरूपात दुकान अथवा व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी त्यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी महापालिका प्रशासनातर्फे लागणारी मदत जलद गतीने करण्याचे निर्देशही खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी दिले.
या बैठकीला डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे, तालुका प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश पाटील, गजानन पाटील, सुभाष पाटील, बंडू पाटील यांच्यासह शांती उपवन मधील रहिवाशी आणि गाळेधारक उपस्थित होते.