Home Uncategorised मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचा १४ वर्षांचा वनवास लवकरच संपणार

मध्य रेल्वेच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचा १४ वर्षांचा वनवास लवकरच संपणार

 

रविवारच्या मेगा ब्लॉक दरम्यान खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी घेतला कामाचा आढावा…

ठाणे दि.२ जानेवारी :
ठाण्यापुढील रेल्वे प्रवाशांच्या दृष्टिने अत्यंत जिव्हाळ्याचा आणि रेल्वे प्रवासासाठी अतिशय महत्वाच्या कळवा-दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांचे अंतिम टप्प्यात आलेले काम युद्धपातळीवर सुरू असून या मार्गिकांच्या कामासाठी कळवा-मुंब्रा धीम्या मार्गावर आज २४ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कामाच्या प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून आढावा घेतला. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्यासमवेत विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल, मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक विलास वाडेकर, ठाणे परिवहन सभापती विलास जोशी, तसेच रेल्वे प्रशासन विभागाचे आणि मुंबई रेल्वे विकास महामंडळाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.

१० ते १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत य रेल्वेमार्गिका वाहतुकीकरिता खुल्या होणार..

कळवा – दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकेच्या प्रकल्पाला २००७-२००८ मध्ये मंजूरी मिळाली होती. परंतु गेली अनेक वर्षे प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पाला २०१५-२०१६ पासून खऱ्या अर्थाने गती मिळाली. ठाण्यापुढील रेल्वे प्रवास सुखकर आणि गतीने व्हावा याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पहिल्यांदा खासदार झाल्यावर लगेचच ठाणे दिवा दरम्यान पाचव्या – सहाव्या रेल्वे मार्गिकांच्या प्रकल्पाकडे लक्ष केंद्रीत करत पाठपुरावा सुरु केला. केंद्रीय रेल्वे बोर्ड, रेल्वे प्रशासन, मुंबई रेल्वे विकास महामंडळ तसेच लोकसभेच्या अधिवेशन काळात देखील या प्रकल्पासाठी पाठपुरावा करत प्रकल्पादरम्यान आलेल्या अनंत अडचणींमधून मार्ग काढत प्रकल्पाचे काम थांबणार नाही आणि लवकरात लवकर ते पूर्ण होईल, याकरिता खासदार डॉ. श्रीकांत शिंदे कार्यतत्पर राहिले होते. प्रकल्पासाठी लागणाऱ्या जमिनीचे अधिग्रहणाचा विषय, खाडीवरील पूल बांधणी, मार्गिकांचे संरेखनाचे काम यासारख्या अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी सातत्याने प्रयत्नशील राहून ती पूर्ण करताना प्रकल्पासाठी लागणारा निधी देखील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उपलब्ध करुन दिला. रेतीबंदर येथील सीआरझेडचा प्रश्न सोडवत या प्रकल्पासाठी लागणारी पर्यावरण विभागाची मंजुरी मिळवल्याने पाचव्या – सहाव्या रेल्वेमार्गिकांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली. कोविडसारख्या जागतिक महामारीच्या काळातही या फ्रकल्पाचे काम सुरु राहून निर्धारित वेळेत होण्यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्याला गती दिली. आज या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले असून रेल्वे मार्गिकांच्या जोडणीची कामे पूर्ण करुन १० ते १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत या पाचव्या आणि सहाव्या रेल्वेमार्गिका वाहतुकीकरिता खुल्या करण्यात येणार आहेत.

खाडीवरील पुलावर रेल्वे मार्गिकांची प्रत्यक्ष चाचणी उद्यापासून घेण्यात येणार

कळवा – दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गिकेचा हा प्रकल्प ९.५ किमी चा असून यातील खाडी वरील पूल ४.५ किमी. लांबीचा आहे. नव्याने उभारण्यात आलेल्या या खाडीवरील पुलावरील रेल्वे मार्गिकांची प्रत्यक्ष चाचणी उद्यापासून घेण्यात येणार असल्याने जुन्या पुलावरील धीम्या गतीच्या रेल्वे गाड्या उद्यापासून या नवीन पुलावरून धावतील, असे यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी सांगितले. उपनगरीय रेल्वे गाड्यां साधारणपणे १०५ किमी प्रति तास या वेगाने धावत असतात. परंतु आता या चाचणी दरम्यान लोकल या सुरुवतीला ३० किमी प्रति तास या गतीने धावतील. नंतर ही गती वाढवत सुमारे ५० किमी प्रति तास, त्यानंतर ७० किमी प्रति तास एवढी गती राखत अंतिम चाचणी काळात पूर्ण क्षमतेने म्हणजेच १०५ किमी प्रति तास वेगाने धावतील, अशी माहितीही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. प्रकल्प पूर्ण होणासाठी आणखी तीन मेगा ब्लॉक रेल्वेतर्फे घेण्यात येणार असून पुढील आठवड्यात यापैकी एक मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. यामुळे या चाचणी दरम्यानच्या काळात उपनगरीय रेल्वे गाड्यांचे वेळापत्रकावर परिणाम होणार असून रेल्वे सेवेमध्ये धीमेपणा येणार आहे. परंतु ही काही आठवड्यांचीच बाब असून लवकरच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांचे सर्व काम पूर्ण होत १०-१५ फेब्रुवारी पर्यंत या मार्गिकां नागरिकांच्या सेवेत रुजू होतील. यासाठी नागरिकांनी देखील प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.

आज या मेगा ब्लॉक दरम्यान नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ठाणे परिवहन विभागातर्फे सकाळी ६ वाजल्यापासून या मार्गावर अतिरिक्त बस सोडण्यात येत असून सकाळी ११ वाजेपर्यंत सुमारे ६८-७० बसेस धावल्या असून नागरिकांना त्यांच्या इच्छित वेळेत आणि ठिकाणी जाण्यासाठी ठाणे परिवहन विभागातर्फे अथक परिश्रम घेतले जात असल्याबद्दल ठाणे परिवहन विभाग, तसेच पोलिस प्रशासन आणि वाहतूक विभागाचे देखील त्यांनी यावेळी आभार व्यक्त केले.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण, ठाणे ते कल्याण मार्गावर फेऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ

सद्यस्थितीत या मार्गावर धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या (एक्सप्रेस) गाड्यांमुळे लोकल सेवेमध्ये अडसर निर्माण होत उपनगरीय गाड्यांच्या गतीवर परिणाम होत आहे. अनेक वेळा एक्सप्रेस गाड्यांच्या क्रॉसिंगकरिता लोकल गाड्या रद्द देखील कराव्या लागातात. परंतु या पाचव्या व सहाव्या रेल्वेमार्गिका खुल्या झाल्यावर जलद, धिम्या लोकल सेवा आणि एक्सप्रेस गाड्यांना प्रत्येकी दोन मार्गिका उपलब्ध होणार असल्याने या मार्गात कुठेही क्रॉसिंग होणार नाही. यामुळे क्रॉसिंगमुळे वाया जाणारा वेळ वाचणार असून उपनगरीय रेल्वे सेवा अधिक गतिमान होतील. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते कल्याण तसेच ठाणे ते कल्याण मार्गावर लोकल फेऱ्यांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होईल व त्यामुळे ठाण्यापुढील रेल्वेप्रवाशांना नक्कीच मोठा दिलासा मिळेल, असा दृढ विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा