ठाणे, कल्याण, भिवंडी दि.20 मार्च :
केंद्रीय निवडणूक आयोगाने काही दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील निवडणूकीसंदर्भातील माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील तीन लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण 65 लाखांहून अधिक मतदार असून युवा मतदारांची संख्या साडे अकरा लाखांच्या घरात असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येत आहे. (Thane, Bhiwandi and Kalyan have so many lakh voters in the Lok Sabha; Most youth voters in Bhiwandi Lok Sabha)
ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या 5 व्या टप्प्यामध्ये म्हणजेच 20 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या आचारसंहिता पथकामध्ये 1 जिल्हा नोडल अधिकारी, 3 लोकसभा मतदारसंघ नोडल अधिकारी, 18 विधानसभा मतदारसंघ नोडल अधिकारी, प्रत्येक लोकसभा मतदारसंघासाठी 9 फ्लाईंग स्कॉड पथके आणि 9 स्टॅटीक सर्वेलियन्स टीम स्थापन करण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्यातील मतदारांची आकडेवारी…
ठाणे जिल्ह्यामध्ये लोकसभेचे ठाणे, भिवंडी आणि कल्याण असे तीन प्रमूख मतदारसंघ येतात. ज्यामध्ये एकूण मतदारांची संख्या 65 लाख 1 हजार 671 इतकी आहे. ज्यामध्ये पुरुष मतदार 35 लाख 6 हजार 82 आणि 29 लाख 94 हजार 315 इतक्या महिला मतदार आणि इतर मतदारांची संख्या 1 हजार 274 इतकी आहे. त्यातही नवमतदारांचा विचार केल्यास 18 ते 19 वयोगटाचे 82 हजार 237, 20 ते 29 वयोगटाचे 10 लाख 6 हजार 117 असे मिळून 11 लाख 42 हजार 444 इतके युवा मतदार ठाणे जिल्ह्यात आहेत. तर 85 वर्षांपेक्षा अधिक वय असणारे 58 हजार 966 मतदार असून जिल्ह्यातील दिव्यांग मतदारांची संख्या 34 हजार 976 इतकी आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक मतदार…
ठाणे लोकसभा मतदारसंघात 24 लाख 43 हजार 254 मतदार असून 13 लाख 15 हजार 61 पुरुष आणि 11 लाख 27 हजार 995 महिला मतदार आहेत. तर 18 ते 29 वयोगटाच्या युवा मतदारांची संख्या 3 लाख 94 हजार 523 इतकी निर्णायक आहे. तर एकूण 455 ठिकाणी 2 हजार 448 इतकी मतदान केंद्र असणार आहेत.
भिवंडी लोकसभेत सर्वाधिक युवा मतदार…
भिवंडी लोकसभा मतदारसंघात 20 लाख 39 हजार 459 मतदार असून 11 लाख 5 हजार 311 पुरुष आणि 9 लाख 33 हजार 810.महिला मतदार आहेत. तर 18 ते 29 वयोगटाच्या युवा मतदारांची संख्या तब्बल 4 लाख 14 हजार 48 इतकी निर्णायक आहे. तर एकूण 1 हजार 41 ठिकाणी 2 हजार 189 इतकी मतदान केंद्र असणार आहेत.
कल्याण लोकसभेतही 20 लाखांहून अधिक मतदार…
तर ठाणे जिल्ह्यातील तिसऱ्या म्हणजेच कल्याण लोकसभा मतदारसंघात 20 लाख 18 हजार 958 मतदार असून 10 लाख 85 हजार 710 पुरुष आणि 9 लाख 32 हजार 510 महिला मतदार आहेत. तर 18 ते 29 वयोगटाच्या युवा मतदारांची संख्या तब्बल 3 लाख 33 हजार 873 इतकी आहे. तर एकूण 435 ठिकाणी 1 हजार 955 इतकी मतदान केंद्र असणार आहेत.
तर यंदा प्रथमच दिव्यांग आणि 85 वर्षांहून अधिक वयोवृद्ध मतदारांसाठी घरातून मतदान करण्याची सुविधाही देण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील दिव्यांग आणि 85 वर्षांहून अधिक वयोवृद्ध मतदारांच्या घरी जाऊन त्याबाबत विचारणा केली जाणार आहे. त्यांनी होकार दिला तर अशा मतदारांना घरातून टपाली मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.
तर ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी मनिषा जायभाये – धुळे यांची, भिवंडी लोकसभेसाठी संजय जाधव यांची तर कल्याण लोकसभेसाठी सुषमा सातपुते यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
तर यंदा मतदारांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि देशातील लोकशाहीच्या या महाउत्सवात उत्स्फूर्त सहभागी होण्याचे आवाहन निवडणूक आयोगातर्फे करण्यात आले आहे.