डोंबिवली दि.29 सप्टेंबर :
महिलांची सुरक्षा आणि रेल्वे प्रवासात वाढलेले गुन्ह्यांचे प्रमाण लक्षात घेऊन प्रवाशांसाठी कोपर, ठाकुर्ली रेल्वे स्थानकात डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत दोन पोलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहेत. या पोलीस मदत केंद्राचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते आज करण्यात आले.
लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या संकल्पनेतून ही मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत. ठाकुर्ली आणि कोपर या रेल्वे स्थानक परिसरात पश्चिमेला ही मदत केंद्र ठेवण्यात आले असून 24 तास पोलीस कर्मचारी त्यामध्ये कार्यरत असतील. तसेच एखादी घटना घडल्यास प्रवाशांनाही लगेचच पोलिस किंवा इतर सहकार्य उपलब्ध होण्यास मोठी मदत मिळेल असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांच्यासह विविध पोलीस अधिकारी उपस्थित होते.