पूर्वीच्या पक्षात १०० टक्के राजकारण होत असल्याचा आरोप
ठाणे दि.18 एप्रिल :
उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी आज शेकडो पदाधिकारी – कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचे स्वागत करत शिवसेना वाढवण्यासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या. (Thackeray fractions Kalyan district women’s organizer Vijaya Pote in Shiv Sena; Entered the presence of Chief Minister Eknath Shinde)
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ही शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र आता १०० टक्के राजकारण होते. त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे यावेळी विजया पोटे यांनी सांगितले. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामे केली असून त्यामुळे यंदा त्यांची हॅट्ट्रिक नक्की होईल, असा विश्वासही विजया पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
विजया पोटे या गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असून महिला आघाडीत त्यांचे संघटन चांगले आहे. त्यांच्यासोबत उपशहर संघटक पल्लवी बांदिवडेकर, नमिता साहू, भारती भोसले, मंदाकिनी गरुड, मोनिका इंगळे, रंजना पाटील, वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक, उपविभाग संघटक, शाखा संघटक, उपशाखा संघटक, युवासेना पदाधिकारी असे सुमारे १०० पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना राज्य समन्वयक नरेश म्हस्के, शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंढे, उल्हासनगर उपजिल्हाप्रमुख अरुण आशान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फेसबुकवर नव्हे, फेस टू फेस काम करणारे पाहिजे…
यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजया पोटे यांचे शिवसेनेत स्वागत केले. तसेच महाराष्ट्राला आज फेसबुकवर काम करणारे नको, तर फेस टू फेस काम करणारे हवेत, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागील १० वर्षात कल्याण लोकसभेत विक्रमी कामे केली असून ते यंदा नुसतेच विजयी होणार नाहीत, तर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि शिवसेना वाढवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचनाही त्यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना दिल्या.