भिवंडी दि.19 नोव्हेंबर :
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोमार्गापैकी भिवंडी-कल्याण मार्गाच्या निविदा लवकरात लवकर काढण्याचे निर्देश केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले आहेत. भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मुंबईतील सह्याद्री विश्रामगृहात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी भिवंडी – कल्याण मेट्रोसह विविध विकासकामांचा आढावा घेत ही सर्व कामे तातडीने सुरू करण्याचे त्यांनी निर्देश दिले.
ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रोमार्गापैकी भिवंडी-कल्याण मार्गाच्या निविदा लवकरात लवकर काढाव्यात, बदलापूर मेट्रोचा डीपीआर लवकरात लवकर करावा, भिवंडी तालुक्यातील उर्वरित गावांना `एमएमआरडीए’चा निधी मिळावा, मुरबाड, शहापूर आणि वाडा तालुक्याचा `एमएमआरडीए’मध्ये समावेश करावा, `एमएमआरडीए’ने काही कामांना दिलेली स्थगिती रद्द करावी, भिवंडीत मेट्रोच्या कामामुळे उखडलेला कॉंक्रीट रस्ता पुन्हा कॉंक्रीटचा करून द्यावा, वासिंद उड्डाणपुलाचे काम वेगाने करावे, जलजीवन मिशनअंतर्गत पाणीपुरवठा योजना हाती घ्याव्यात, बदलापूर नगर परिषद, मुरबाड नगर पंचायत, शहापूर नगर पंचायत, रायते, खडवली, वांगणी गावाच्या पाणी पुरवठा योजना, मुरबाड, शहापूर येथील नगर पंचायतीची नवी इमारत, बदलापूर नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण योजनांतर्गत रस्ते विकासासाठी निधी, नाबार्डच्या माध्यमातून मोठ्या पुलांच्या कामांना मंजुरी देऊन निधी उपलब्ध करावा, पूरहानी कार्यक्रम मंजूर करावा, विशेष रस्ते दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करावेत, शहापूर तालुक्यातील रेल्वे अंडरपासकडील रस्ता तयार करावा आदी निर्देश राज्यमंत्री कपिल पाटील यांनी यावेळी दिले. त्यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आले.
तर मुरबाड, शहापूर तालुक्याचे वेगाने नागरीकरण होत आहे. मात्र, त्यांचा `एमएमआरडीए’मध्ये समावेश करण्यात आलेला नाही, याकडे आमदार किसन कथोरे यांनी लक्ष वेधले.
यावेळी नगरविकास, सार्वजनिक बांधकाम, एमएमआरडीए, पाणी पुरवठा, महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. कोरोना काळाबरोबरच निधीअभावी प्रलंबित प्रकल्प, रस्ते आणि विकासकामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी या बैठकीत दिल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील विकासकामांना गती मिळणार आहे.