रिंगरोड नगर महामार्गाला जोडण्याच्या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश
कल्याण दि. ४ ऑक्टोबर :
कल्याण लोकसभा मतदारसंघातील वेगवान वाहतुकीसाठी महत्वाकांक्षी असलेल्या कल्याण रिंगरोड प्रकल्पातील तिसऱ्या टप्प्याची निविदा येत्या 10 ऑक्टोबर रोजी जाहीर केली जाणार आहे. या कामामुळे या मार्गाला गती मिळणार आहे. तसेच रिंगरोड प्रकल्पातील सातव्या टप्प्यातील टिटवाळा येथून हा मार्ग थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडला जाणार आहे. (Tender for third phase of Kalyan Ring Road on October 10; A ring road will also be connected to the Nagar highway)
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने कल्याण लोकसभा मतदारसंघात एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आज मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीए मुख्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे, अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर, डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, माजी नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, उल्हासनगरचे माजी नगरसेवक अरुण आशान, कलवंतसिंह सहोता, अंबरनाथचे माजी उपनगराध्यक्ष अब्दूलभाई शेख आणि शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील वेगवान वाहतुकीच्या दृष्टीने सुरू असलेल्या महत्वाकांक्षी रिंगरोड प्रकल्पाला गती देण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती. त्यावर अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. महत्त्वाकांक्षी रिंगरोडच्या मानकोली ते दुर्गाडी या मार्गातील 86 टक्के भूसंपादन पूर्ण झाले आहे. त्यामुळे टप्पा 3 ची निविदा जाहीर करण्याची मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर बोलताना एमएमआऱडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी या टप्प्यासाठी 10 ऑक्टोबर रोजी एमएमआरडीए निविदा जाहीर करेल अशी माहिती दिली. याच रिंग रोड प्रकल्पातील टप्पा 4 ते 7 मधील असलेले घरे, झोपड्या आणि उद्योगाचे अडथळे दूर करत त्या कामाला गती दिली जाईल, असेही आश्वासन यावेळी श्रीनिवास यांनी दिले. या कामासाठी आवश्यक भूसंपादन पूर्ण करण्यासाठी बाधितांना तात्काळ बीएसयूपी घरांचे वाटप केले जाणार आहे. यामुळे दुर्गाडी ते टिटवाळा हा वेळखाऊ प्रवास अवघ्या 15 मिनिटांवर येईल, अशी माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली.
अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडण्याची सूचना…
रिंग रोड प्रकल्पातील टप्पा 1, 2 आणि 8 ची भूसंपादन प्रक्रिया सुरू करून कामाला गती देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. रिंग रोड प्रकल्पात टप्पा क्रमांक सातनंतर टिटवाळ्याच्या रुंदे येथील रस्ता पुढे टप्पा 8 मध्ये थेट कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गाला गोवेली येथे जोडण्याची सूचना खासदार डॉ. शिंदे यांनी केली होती. त्याला मंजुरी देत त्यासाठीही भूसंपादन करण्याचे आदेश यावेळी श्रीनिवास यांनी दिले. या कामामुळे खऱ्या अर्थाने प्रस्तावित रिंग रोड परिपूर्ण होणार आहे. डोंबिवली – मानकोली पुलाचे काम येत्या एप्रिल 2023 पर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय एमएमआरडीए प्रशासनाने ठेवले आहे. त्यामुळे डोंबिवली – ठाणे प्रवास 15 मिनिटांवर येईल.
मेट्रो 12ला गती
कल्याण – तळोजा या मेट्रो मार्ग क्रमांक 12 ला गती देण्याचा निर्णय झाला यावेळी झाला. या प्रकल्पासाठी सल्लागाराची नेमणूक झाली असून लवकरच निविदा जाहीर करून कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. या मार्गामुळे शहरी भागासह ग्रामीण भागही थेट नवी मुंबईला मेट्रोने जोडला जाणार आहे.
शहाडचा पूल रूंद होणार
कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर असलेला आणि कल्याण –उल्हासनगर शहराला जोडणारा शहाड येथील पूल अरूंद असल्याने येथे वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या पुलाच्या रूंदीकरणाची मागणी करण्यात आली होती. त्यावर बोलताना शहाड येथील अरुंद पुलाच्या रुंदीकरणावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हा पूल सध्या 10 मीटरचा असून त्याला 30 मीटर करण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली आहे.
विठ्ठलवाडी ते शहाड उन्नत मार्ग
विठ्ठलवाडी, कल्याण पूर्व किंवा उल्हासनगर शहरातील प्रवाशांना शहाड स्थानक किंवा त्या भागात जाण्यासाठी मोठा वळसा घालून जावे लागते. त्यामुळे याठिकाणी विठ्ठलवाडी बस आगार ते शहाड उन्नत मार्ग उभारण्याची मागणी यावेळी खासदार डॉ. शिंदे यांनी केली. त्या मार्गाचा कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाकडून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला जात असून त्यालाही मंजूरी देण्यात आली. या उन्नत मार्गामुळे वेळखाऊ प्रवास जलद होणार आहे.