
असह्य उकाड्याने नागरिक हैराण
कल्याण डोंबिवली दि.7 एप्रिल :
गुढीपाडव्यानंतर कल्याण डोंबिवलीतील तापमानाचा चढता आलेख कायम असून आज पारा थेट 42 अंशाच्या जवळ पोहोचल्याचे दिसून आले. कल्याण आणि डोंबिवलीमध्ये आज 41.9 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी दिली. तसेच पुढील दोन दिवस अशाच प्रकारची परिस्थिती राहील अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.
मार्च महिन्यामध्ये शेवटच्या टप्प्यात उष्णतेची लाट येऊन गेल्यानंतर तापमानाचा पारा पुन्हा चाळीशीच्या आतमध्ये आला होता. मात्र गुढीपाडवा झाला आणि चैत्र महिना जसा लागला तशी या पाऱ्याने एकदम उसळी घेतलेली पाहायला मिळत आहे. त्यातच शुक्रवारी आलेले धुळीचे वादळ, ढगाळ वातावरण काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसाच्या शिडकाव्याने उकाड्यापासून काहीशी सुटका मिळाली. मात्र हा अल्पकाळचाच दिलासा ठरला आणि पुन्हा शनिवारपासून तापमानात चांगलीच वाढ झाली.
शनिवारी कल्याण परिसरात 41.3 अंश सेल्सिअस तर डोंबिवलीमध्ये 41 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्यापाठोपाठ आजही कल्याण डोंबिवली परिसरात तापमानात आणखी वाढ झाली आणि पारा थेट 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. परिणामी असह्य असा उकाडा आणि उष्णतेचे चटके सोसावे लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत.
उत्तरेकडून येणारे कोरडे वारे यामुळे ही तापमान वाढ झाली असल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी एलएनएनशी बोलताना दिली. कारण ४२ तापमान हे सामान्य पेक्षा ४ ने अधिक असून अशीच परिस्थिती उद्या आणि परवा राहील. उष्णतेची लाट ही समुद्र किनाऱ्याकडील भाग सोडून अंतर्गत कोकणात म्हणजेच ठाणे, पालघर, रायगड या भागात ठळकपणे जाणवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
आजचे कमाल तापमान 🌡️
कल्याण 41.9 अंश सेल्सियस
डोंबिवली ४१.९
मुंबई ३६.२°
विरार ३८.५
नवी मुंबई ३९.८
ठाणे ४०.२
पनवेल ४०.७
पालघर ४१
खारघर ४१.५
मुंब्रा ४१.१
उल्हासनगर 42
बदलापूर ४२
अंबरनाथ 42.5
पलावा ४२.५
कर्जत ४३
मनोर ४३.१
मुरबाड ४३.५
धसई ४३.९