मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर केडीएमसी ॲक्शन मोडमध्ये
कल्याण डोंबिवली दि.27 जून :
पुण्यातील आधी अल्पवयीन मुलाला मद्यविक्री आणि अपघाताचे प्रकरण त्यापाठोपाठ पबमध्ये अल्पवयीन मुलांच्या ड्रग्ज प्रकरणानंतर राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. महापालिका, पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्याच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील या घटनांची गंभीर दखल घेत संपूर्ण राज्यातील प्रशासकीय यंत्रणाना अनधिकृत बार, पब्जवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानंतर आता खडबडून जागे झालेल्या केडीएमसी प्रशासनानेही आज केडीएमसी अधिकारी, पोलीस प्रशासन आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत अशा अनधिकृत व्यवसायांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
त्या अनधिकृत बांधकामांना केडीएमसीकडून नोटीसा…
तर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांनीही आज शहरातील पोलीस अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि केडीएमसी अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. ज्यामध्ये कल्याण डोंबिवलीतील अनधिकृत बार, ढाबे, गुटखा टपऱ्या यांच्यावर नि:पक्षपातीपणे धडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. महापालिकेच्या प्रभागातील सहा. आयुक्तांनी यापूर्वीच अशा अनधिकृत बांधकामांना नोटीसा बजाविल्या असून त्यांच्यावर पुढील कारवाईही सुरु करण्यात आल्याचे डॉ. जाखड यांनी सांगितले.
पुढील आठवड्यापासून तीव्रगतीने कारवाई…
त्यासोबतच ज्या अनधिकृत बार , तत्सम ठिकाणांवर गुन्हे दाखल आहेत अशांची यादी पोलीस विभागाकडून महापालिकेला देण्यात आली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या समन्वयाने पुढील आठवड्यापासून तीव्रगतीने कारवाई करण्यात येईल, अशी माहितीही आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांनी दिली आहे.
या विषयाबाबत परिमंडळ-३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, महापालिका विभागीय उपआयुक्त, कल्याण- डोंबिवलीतील सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस खात्यातील वरीष्ठ अधिकारी, महापालिकेच्या सर्व प्रभागाचे सहा.आयुक्त आणि इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता.
पुण्यातील घटनेची मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून गंभीर दखल…
सांस्कृतिक राजधानी पुण्यात घडलेल्या घटनेनंतर राज्यातील अल्पवयीन मुलांची नशाखोरी आणि त्यांची अनधिकृत विक्री होणाऱ्या ठिकाणांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील घटनेची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण राज्यातील बेकायदेशीर पब्ज, बारवर तसेच अंमली पदार्थांशी निगडीत असलेल्या बांधकामांवर बुलडोझर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्याचा परिणाम म्हणून आज सकाळपासून ठाणे आणि मिरा भाईंदर शहरातील अशा अनधिकृत बांधकामांवर तिथल्या महापालिकेकडून तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे.