कल्याण दि.5 ऑक्टोबर :
कल्याण पूर्वेतील चेतना शाळा ते नेवाळी नाक्यापर्यंतच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून कंत्राटदाराला ब्लॅकलिस्ट करून अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्तांकडे केली आहे.
चेतना शाळा ते नेवाळी नाका मलंगगड रस्ता हा कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ , बदलापूर आणि ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा आहे. या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमूळे अपघाताच्या तक्रारी येत असल्याने केलेल्या पाहणी दौऱ्यात रस्त्याच्या दर्जा आणि केडीएमसीने कंत्राटदाराला दिलेल्या बिलाबाबत धक्कादायक बाबी उघडकीस आल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. या रस्त्याचे काम महानगरपालिकेकडून ज्या कंपनीला ४२ कोटीना दिले असून ती कंपनी मुंबईमध्ये ब्लॅकलिस्टेड असल्याचेही आमदार पाटील यांनी सांगितले. तसेच महापालिकेने या कंपनीला दिनांक १३ एप्रिल २०१७ रोजी काम देत आणि १२ सप्टेंबर २०१८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
मात्र या कालावधीत काम पूर्ण न झाल्याने पुन्हा ३१ मे २०२१ पर्यंत मुदतवाढ देत मूळ रकमेत जवळपास ४ कोटी रुपये कंत्राटदाराला वाढवून देण्यात आल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले. तर यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे रस्त्याचे काम ७५ टक्केही झाले नसताना महानगरपालिकेने कंत्राटदाराला ९५ टक्केपेक्षा जास्त रक्कम दिल्याचा दावा पाटील।यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिलेल्या पत्रात केला आहे.
अशा या महत्त्वाच्या रस्त्यामध्ये कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी संगनमत करुन कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करत कल्याण-डोंबिवली करांच्या पैशांवर दरोडा टाकल्याचा गंभीर आरोप आमदार राजू पाटील यांनी केला आहे.त्यामुळे केडीएमसी आयुक्त यांनी स्वतः याबाबत चौकशी करावी आणि या रस्त्याची पाहणी करावी. तसेच या रस्त्यावर कार्यादेश दिल्यापासून आतापर्यंत निकृष्ट दर्जाच्या कामाला जे-जे अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित निलंबित करावे आणि कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून देण्यात आलेली रक्कम वसूल करण्याची मागणी आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे केली आहे.