आमदार विश्वनाथ भोईर यांनी घेतली उपोषणकर्त्या डॉक्टरांची भेट
कल्याण दि.15 ऑक्टोबर :
गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या कोलकातामधील डॉक्टरांना आपला पाठींबा दर्शवण्यासाठी “कल्याण डॉक्टर आर्मी”कडून एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण सुरू आहे. कल्याण पश्चिमेच्या नमस्कार मंडळाच्या पटांगणावर सकाळी 6 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत या डॉक्टरांनी या आंदोलनाला सुरुवात केली आहे.
कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरात संताप व्यक्त झाला. देशभरात ठिकठिकाणी डॉक्टरांकडून रस्त्यावर उतरत या घटनेचा निषेध नोंदवला गेला. तर कोलकातामध्ये दोन महिन्यानंतरही हे प्रकरण धुमसतेच असून गेल्या 5 ऑक्टोबरपासून तिथल्या डॉक्टरांनी विविध मागण्यांसाठी उपोषणाचे हत्यार उपसले आहे.
त्याला आता दहा दिवस उलटून जाऊनही पश्चिम बंगाल सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसून उपोषणामुळे 3 डॉक्टरांची प्रकृती गंभीर झाली आहे. कोलकातामधील डॉक्टरांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे.
कल्याण डॉक्टर आर्मीच्या सर्व वैद्यकीय संघटनांचा सहभाग…
कल्याणमध्ये कोवीड काळात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या “कल्याण डॉक्टर आर्मी ” कोलकातामधील डॉक्टरांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत. येथील नमस्कार मंडळामध्ये हे सर्व डॉक्टर एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत. यामध्ये निमा, आयुर्वेद व्यासपीठ, केम्पसवा, केएचडीएफ, आयडीए कल्याण – उल्हासनगर, ए एमडीएफ, टिटवाळा- आंबिवली – मोहने डॉक्टर असो, कल्याण डोंबिवली फिजिओथेरपी असो. आदी संघटनांचे डॉ. राहुल काळे, डॉ. अभिजीत ठाकूर, डॉ. दिपक पोगाडे, डॉ. तक्षिला मोरे, डॉ. नीरज पाल, डॉ. योगेश कवठे, डॉ. चंद्रशेखर तांबडे, डॉ. तन्वी शहा आदी प्रमूख डॉक्टर मंडळी उपस्थित होती.
पश्चिम बंगाल सरकारने कोलकातामधील या उपोषणकर्त्या डॉक्टरांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा येत्या काळात देशभरात यापेक्षा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा कल्याण डॉक्टर आर्मीच्या डॉ. प्रशांत पाटील यांनी यावेळी दिला.
उच्चस्तरीय कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार – आमदार भोईर
दरम्यान कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी या कल्याणातील उपोषणकर्त्या डॉक्टरांची भेट घेत याप्रकरणी उच्चस्तरीय कार्यवाही होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच कोलकाता येथे घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह असून जे इतरांचा जीव वाचवतात त्या डॉक्टर मंडळींच्या जीवाशी खेळणे पश्चिम बंगाल सरकारने बंद करावे असे मतही आमदार विश्वनाथ भोईर यांनी यावेळी व्यक्त केले. आपल्या मागण्यांचे एक निवेदन डॉक्टर संघटनांकडून यावेळी आमदार विश्वनाथ भोईर यांना देण्यात आले.