कल्याण दि.16 मार्च :
27 गावांमध्ये केल्या जाणाऱ्या पाणी पुरवठ्याची देयके (पाणी बिल) कल्याण डोंबिवली महापालिकेकडून अदा न करण्यात आल्याने एमआयडीसीने या गावातील पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात 27 गावांतील नागरिकांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम असून 27 गावांतील काही भागात पाणी पुरवठ्यामध्ये कपात सुरू केल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.
एमआयडीसी (महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ) कडून 27 गावांना दररोज 48 नलजोडण्याद्वारे 78 दशलक्ष लिटर एवढा पाणी पुरवठा केला जातो. त्यासाठी दर महिन्याला केडीएमसीकडून 1 कोटी 90 लाख रुपये मासिक देयक प्राप्त होणे अपेक्षित आहे. या देयकांचा भरणा करण्यासाठी वारंवार विनंती करूनही गेल्या वर्षभरापासून केडीएमसीने ती रक्कम न भरल्याचे एमआयडीसीने केडीएमसीला पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे जानेवारी 2021 पर्यंत ही एकूण थकबाकीची रक्कम तब्बल 422 कोटींच्या घरात गेली आहे. ज्यामध्ये निव्वळ थकबाकी 101 कोटी असून 235 कोटींहून अधिक विलंब शुल्काची रक्कम असल्याचेही त्यात मांडण्यात आले आहे. तर फेब्रुवारी 2020 नंतर केडीएमसीकडून मासिक देयके अदा करण्यात आलेली नसून त्यामुळे महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीवर ताण आल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर केडीएमसीने थकबाकीची रक्कम आणि मासिक देयके अदा करावीत अन्यथा 27 गावांतील पाणी पुरवठ्यात कपात करण्याचा इशारा एमआयडीसीने या पत्राद्वारे दिला आहे. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात 27 गावांमध्ये पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे एमआयडीसीने काही ठिकाणी ही पाणी कपात लागू केल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून 27 गावांतील काही भागात नेहमीपेक्षा कमी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी केल्या जात आहेत. यावर आता केडीएमसी प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे लवकरच स्पष्ट होईल अन्यथा येत्या काळात 27 गावातील पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर केडीएमसीला थकबाकी देयके अदा करण्याबाबत पत्र दिल्याला एमआयडीसी अधिकारी संजय ननावरे यांनी दुजोरा दिला आहे. तसेच 27 गावांत अद्याप पाणीकपात लागू झालेली नसून उलटपक्षी मंजूर कोट्यापेक्षा दीडपट अधिक पाणीपुरवठा याठिकाणी केला जात असल्याची प्रतिक्रिया एमआयडीसीचे अधिकारी संजय ननावरे यांनी एलएनएनला दिली.