
कल्याण दि.20 जानेवारी :
गेल्या 3 महिन्यांपासून पगार थकवल्याविरोधात कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. या कर्मचाऱ्यांनी थेट महापालिका मुख्यालयावर धडक मारत जोरदार घोषणाबाजी केली.
दरवेळेला आम्हाला कंत्राटदाराकडून पगार देण्यात विलंब होत आहे. मिळाला तरी तुटपुंजा पगार मिळतो, दरवेळेला 3 महिने पगारासाठी थांबावे लागत असल्याने कामगारांची अवस्था बिकट झाल्याचे या कामगारांनी सांगितले. याबाबत कंत्राटदाराकडे विचारणा केली असता तो महापालिकेकडे बोट दाखवून केडीएमसीकडून पैसे उशिरा मिळत असल्याचे सांगतो. याठिकाणी कचरा उचलण्याचे काम थांबवून लोकांना वेठीस धरण्याची, शहर अस्वच्छ करण्याची आमची कोणतीही इच्छा नसते. मात्र कंत्राटदार आम्हाला दरवेळेस पगारासाठी थकवत असल्याने नाईलाजाने आम्ही आंदोलनाचा मार्ग पत्करल्याचे अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघटनेचे युनीट अध्यक्ष गणेश बेंद्रे यांनी दिली.
दरम्यान याबाबत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्याकडे विचारणा केली असता केडीएमसी दर महिन्याला कंत्राटदाराची बिलं अदा करत असते. केवळ या महिन्यांचे बिल शिल्लक असून तेही आज दिले जाईल अशी माहिती कोकरे यांनी दिली.