डोंबिवली दि.23 डिसेंबर :
डोंबिवली एमआयडीसी मधील घातक रासायनिक कारखान्यातून रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी मोठमोठ्या चिमण्याद्वारे रासायनिक गॅस आणि घातक धूर हवेत सोडला जातो. अनेक घातक केमिकल्स कारखान्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता वापरली जातात. याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्याकडे तक्रारी करूनही कारवाई होताना दिसत नाही. मात्र या अतिविषारी घातक धुर आणि गॅसमुळे आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकाच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यामुळेच नियमाचे उल्लंघन करणाऱ्या या कारखान्यावर कडक कारवाई करावी आणि वारंवार तक्रार करूनही त्यांची दखल न घेणाऱ्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्याची कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Suspend the inefficient pollution control board officer – MLA Rajesh More’s demand to the Chief Minister)
डोंबिवली एमआयडीसी परिसरात असलेल्या कंपन्या मध्ये नियमांचे उल्लघन करत उत्पादन मिळविण्यासाठी घातक रसायने वापरली जात असून केमिकलचा धूर रात्रीच्या वेळी हवेत सोडून हवेचे प्रदूषण केले जात आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असून अनेकदा या घातक रसायणामुळे दुर्घटना घडतात. मात्र यानंतरही प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ठोस कारवाई केली जात नसल्याने नागरिकाचे आरोग्य धोक्यात आले आहे. यामुळेच अशा कामचुकार प्रदूषण नियत्रण मंडळाच्या अधिकार्यावर कारवाई करण्याची मागणी आमदार मोरे यांनी मुख्यमंत्र्याकडे केली आहे. याबाबत एक पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले आहे.